एक शाॅवर की कीमत तुम क्या जानाे शहरी बाबू

    15-Feb-2026
Total Views |
 

water 
 
हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीने केलेली ही जाहिरात आज विस्मरणात गेली आहे.पण, तिचा संदर्भ कळताच ती आठवेल अनेकांना. या जाहिरातीत एका रूक्ष, काेरड्या वाळवंटातल्या गावाचं दृश्य दिसतं. इथे पाण्याचा थेंबही मिळण्याची मारामार आहे. त्यात एका माेकळ्या जागी अचानक एक शाॅवर प्रकटताे. एक गावकरी त्याच्याजवळ जाताे. हे काय प्रकरण आहे त्याला कळत नाही. ताे नळांशी चाळा करताे आणि अचानक वरून शाॅवरमधून पाण्याचे तुषार यायला लागतात. ताे आधी ते पाणी पिताे, तहान भागवताे. मग चेहरा, हातपाय धुताे.
 
हा चमत्कार बघायला गाववाले गाेळा हाेतात, लाेक पाणी पिऊ लागतात. एक बाई मुलाला पाणी पाजते.दुसरी हंडा लावते भरायला. सगळ्या गावात आनंदीआनंद हाेताे. पण याचा अर्थ काय हाेता ते नंतरच्या दृश्यात कळतं. तिथे हे शाॅवरचं युनिट शहरातल्या फ्लॅटमध्ये आहे आणि एक युवक मनसाेक्त शाॅवर घेताेय, भरपूर पाणी वापरताेय. तुम्ही जेवढं पाणी शाॅवरची चंगळ करण्यात वाया घालवता, तेवढ्या पाण्यात एका गावाची तहान भागते, असा जाहिरातीचा संदेश. अर्थात आपमतलबी शहरी मध्यमवर्गाला आम्ही पाण्याचे पैसे देताे तर ते वाटेल तसं वापरण्याचा अधिकार आहे, असं मानताे; पाणी अनमाेल जीवन आहे, हे समजण्याच्या पलीकडे गेलेला आहे ताे.