छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्काेने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान दिले आहे. त्या संदर्भातील युनेस्काेचे अधिकृत प्रमाणपत्र सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी युनेस्काेच्या कार्यालयात स्वीकारले.युनेस्काेच्या मुख्यालयात महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे उभारण्यात आलेल्या भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास शेलार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी भारताचे युनस्काेतील राजदूत विशाल शर्मा यांच्यासह विभागाचे सचिव किरण कुलकर्णी, पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक हेमंत दळवी आदी मान्यवर उपस्थित हाेते.दीड वर्षांच्या प्रदीर्घ प्रक्रियेनंतर गेल्या वर्षी 11 जुलैस युनेस्काेच्या 47व्या अधिवेशनात मराठा मिलिटरी लँडस्केप्सऑफ इंडिया या नावाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील 12 किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत स्थान देण्यात आले.
या मानांकनाचे अधिकृत प्रमाणपत्र शेलार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने स्वीकारले. देशासाठी हा गाैरवाचा क्षण असल्याचे शेलार यांनी सांगितले.छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय आक्रमकांशी लढून उभारलेल्या हिंदवी स्वराज्याचे रक्षण, सुरक्षित शासन व्यवस्था आणि लाेककल्याण यासाठी साकारलेली गड-किल्ल्यांची साखळी हा भारतीय इतिहासातील अद्वितीय लष्करी व राज्यकारभाराचा नमुना मानला जाताे.रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लाेहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी आणि तमिळनाडूतील जिंजी असा 12 किल्ल्यांचा समूह आता जागतिक वारसा स्थळ म्हणून संपूर्ण जगासमाेर आला आहे.