आदिवासी विद्यार्थ्यांना टेकबीद्वारे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात करिअरची नवी संधी उपलब्ध झाली आहे.आदिवासी विकास विभाग आणि एचसीएल टेकमध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार टेकबी (अर्ली करिअर) कार्यक्रमाद्वारे बारावीनंतर थेट आयटी क्षेत्रात प्रवेशाचा मार्ग खुला करण्यात आला. या करारावर आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे आणि संबंधित संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी आदिवासी संशाेधन व प्रशिक्षण संस्थेच्या सहसंचालक चंचल पाटील उपस्थित हाेत्या.सध्या बारावीत शिकत असलेल्या; तसेच अलीकडेच उत्तीर्ण झालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना उद्याेगाभिमुख आयटी प्रशिक्षण आणि राेजगार संधी उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश आहे.
या करारानुसार आदिवासी संशाेधन व प्रशिक्षण संस्था निवड झालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना संपूर्ण प्रशिक्षण शुल्क; तसेच निवास व भाेजन सुविधा प्रदान करेल. एचसीएल टेकची उपकंपनी एचसीएल ट्रेनिंग अँड सर्व्हिसेस प्रा.लि.वर (एचसीएस/टीएसएस) तांत्रिक प्रशिक्षण, मूल्यमापन आणि प्लेसमेंटची जबाबदारी असणार आहे.या सहकार्यामुळे आदिवासी युवकांच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. एचसीएल टेकद्वारे विद्यार्थ्यांना नाेकरीची संधी मिळणार आहे. प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना याचा लाभ हाेईल, असे वाघमारे यांनी सांगितले.