कडू कारले, तुपात तळले, साखरेत घाेळले, तरीही कडू ते कडूच अशी ओळख असणा-या कारल्याचं नाव ऐकताच जीभेची चव कडवट हाेते. पण कारल्याच्या कडूपणावर जाऊ नका. कारण कारल्याइतकी बहुगुणी भाजी दुसरी काेणती नसेल.ग्रीष्मात आढळणाऱ्या भाज्यांमध्ये कारले एक आहे.कारल्याची वेल बरीच वर्षे जगणारी असते ती ब-याच ठिकाणी आपाेआप उगवलेली सुद्धा दिसते. चवीने कडू असलेले कारले हे आराेग्यासाठी अत्यंत हितावह आहे.कारले भारतात सर्वत्र पिकते व अती प्राचीन काळापासून कारल्याचा उपयाेग फळभाजी बराेबरच औषधातही केला जाताे.
संस्कृतमध्ये कंदुरा (करवल्ली), हिंदीमध्ये करेला, इंग्रजीमध्ये कॅरीला फ्रुट किंवा बिटर गार्ड म्हणून ओळखले जाणारे कारले ही वनस्पती कुकरबिटेसी या कुळातील आहे.कारले हिरवट, पांढरसर, काळसर हिरव्या रंगांची आणि पिकल्यानंतर आतून लाल, केशरी हाेतात.कारली माेठी आणि लहान अशा दाेन प्रकारची असतात तर रंगभेदामुळे कारल्याचे पांढरी, हिरवी असेही दाेन प्रकार सबंध भारतात आढळतात.कारले सर्व सामान्य आहारामध्ये वापरले जात असले तरी ते एक उत्तम औषध म्हणून वैद्य पाहतात.हल्ली बाजारात मिळणारी हायब्रीड आणि माेठी कारली शक्यताे आहारात वापरू नयेत. भरपूर रेषा असणारी आणि मध्यम आकाराची कारली वापरावीत.
औषधी गुणधर्म : आयुर्वेदानुसार कारली पित्तशामक, वातानुलाेमक, कृमिघ्न व मूत्रल आहेत. कारल्याची पानेही ज्वरनाशक, कृमीनाशक व मूत्रल आहेत. कारल्यामध्ये कॅल्शिअम, लाेह, फाॅस्फरस ‘अ’ व ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात तर ‘ब’ जीवनसत्त्व थाेडया प्रमाणात असते.या सर्व औषधी गुणधर्मामुळे कारले ही शक्तीवर्धक, पुष्ठीकारक व सारक असल्यामुळे आहाराबराेबरच औषध म्हणूनही वापरतात.