ऊसताेड कामगार मुलांच्या हाॅस्टेलसाठी 159 काेटी निधी

    14-Feb-2026
Total Views |
 
 
 
beed
 
स्थलांतरित ऊसताेड कामगारांच्या मुला-मुलींसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह याेजनेंतर्गत बीड जिल्ह्यातील 11 वसतिगृहांच्या बांधकामासाठी 159 काेटी 36 लाखांच्या बांधकाम अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालक मंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिली.ऊसताेड कामगारांच्या मुलांची शिक्षणाबाबतची आस्था वाढून त्यांचा पुढील शिक्षणाचा मार्ग सुकर करण्यासाठीस्थलांतरित ऊसताेड कामगारांच्या मुला- मुलींसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह याेजना सुरू करण्यात आली आहे. या याेजनेंतर्गत राज्यातील ऊसताेड कामगारांची संख्या अधिक असलेल्या 41 तालुक्यांच्या ठिकाणी मुलांसाठी 41 व मुलीसाठी 41 अशी एकूण 82 (प्रत्येकी 100 विद्यार्थी क्षमता) शासकीय वसतिगृह सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. त्यानुसार प्रथम टप्प्यात मुलांसाठी 10 व मुलींसाठी 10 अशी एकूण 20 शासकीय वसतिगृहे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. या याेजनेत मान्यता देण्यात आलेल्या 82 शासकीय वसतिगृहांपैकी पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आलेली 20 शासकीय वसतिगृहे वगळता उर्वरित 62 शासकीय वसतिगृहे सुरू करण्यास मान्यताही देण्यात आली आहे.या याेजनेत बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात दाेन (मुलांचे 1 व मुलीचे 1, प्रत्येकी 100 विद्यार्थी क्षमता) अशी एकूण 22 शासकीय वसतिगृहे सुरू करण्यास सामाजिक न्याय विभागाने यापूर्वीच मान्यता दिली आहे.