कुंभमेळ्यासाठी मध्य रेल्वेचा कायापालट हाेणार

    12-Feb-2026
Total Views |
 

railway 
 
आगामी कुंभमेळ्यासाठी येणारा भाविकांचा ओघ लक्षात घेऊन मध्य रेल्वेने नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसरातील पायाभूत सुविधांच्या विकासाला गती दिली आहे.आसपासच्या स्थानकांची क्षमता वाढवणे, प्रवाशांच्या सुविधांत लक्षणीय सुधारणा करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. जाेडीला रेल्वे कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यात येणार आहे. 12 रेल्वे स्थानकांवर अत्याधुनिक प्रणालीद्वारे सुरक्षितता, गाड्यांची संख्या वाढवण्याची क्षमता विस्तारली जात आहे.नाशिकमधील 2015 मधील कुंभमेळ्याच्या तुलनेत 2027 मध्ये जवळपास 50 पट अधिक म्हणजे दाेन ते तीन काेटींहून अधिक भाविक येण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने पायाभूत सुविधांच्या विकासाचा व्यापक कार्यक्रम हाती घेतला आहे. त्या अंतर्गत प्रवासी सुविधा, पायाभूत सुविधा, सिग्नलिंग यंत्रणा यंत्रणा सक्षम करून सुरक्षित व कार्यक्षमतेने व्यवस्थापनाचे उद्दिष्ट आहे. भुसावळ विभागाचे रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांच्या देखरेखीखाली कुंभमेळ्याशी संबंधित पायाभूत सुविधांच्या कामांवर लक्ष दिले जात आहे. कुंभमेळ्याच्या तयारीसाठी अधिकाऱ्यांच्या पथकाची पूर्णवेळ नियु्नती करण्यात आली आहे. पायाभूत सुविधांच्या माध्यमातून नाशिक विभागातील प्रवासी सुविधा मजबूत हाेणार आहे.
 
पाच प्रमुख स्थानकांवर ट्रॅक टाकणे, सिग्नल यंत्रणा सुधारणे, विजेशी कामे यांसारख्या पायाभूत सुविधांना प्राधान्य देण्यात आले. पुढील टप्प्यात गाड्या उभ्या करण्यासाठी नवीन मार्गिकेची जाेडणी आणि विजेच्या कामांचे नियाेजन आहे.प्रवाशांची सुरक्षितता वाढवण्यासाठी; तसेच अधिक गाड्या सुरळीतपणे चालवण्यासाठी मनमाड-इगतपुरीदरम्यान स्वयंचलित सिग्नल यंत्रणा टप्प्याटप्प्याने बसवली जात आहे. उगाव व निफाड येथील कामे कुंभमेळ्यानंतर केली जाणार आहेत.रेल्वे प्रशासन केवळ स्थानकांचे सुशाेभीकरण करणार नाही, तर त्यांची तांत्रिक क्षमता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यासाठी भुसावळ, जळगाव, मनमाड, नाशिक राेड, देवळाली, ओढा, खेरवाडी, कसबे सुकणे यासह एकूण 12 स्थानकांवर इलेक्ट्राॅनिक इंटरलाॅकिंग ही अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यात येणार आहे. काेट्यवधी भाविकांच्या गर्दीत रेल्वेचे परिचालन काेणत्याही धाेक्याशिवाय पार पाडण्यास हे तंत्रज्ञान महत्त्वाचे आहे.या यंत्रणेमुळे रेल्वे मार्ग आणि स्थानकांची क्षमता वाढणार आहे.