संधिवात म्हणजे सांध्यांमध्ये येणारी सूज. शरीरातील वेगवेगळ्या सांध्यांना विविध कारणांमुळे सूज येते, त्यामुळे वेदना हाेतात आणि त्या सांध्यांची हालचाल हळूहळू कठीण हाेत जाते.हीच अवस्था म्हणजे संधिवात किंवा आर्थरायटिस. या आजाराबाबत लक्षात ठेवण्यासारखी गाेष्ट म्हणजे वय वाढत गेलं की खांदे, मान, गुडघे, काेपरे अशा सांध्यांमध्ये लहान-माेठ्या तक्रारी सुरू हाेतात. या तक्रारी सुरुवातीलाच ओळखून याेग्य उपचार सरू केले, तर त्याचा माेठा फायदा हाेताे.वयानुसार हाेणारा संधिवात वयाबराेबर हळूहळू वाढत जाताे, पण या वाढीचा स्पीड प्रत्येकाचा वेगवेगळा असताे. आपल्याला जाे काही इलाज करायचा आहे ताे या स्पीडवर.
माझ्याकडे दिवसाला असे अनेक रुग्ण येतात जे आर्थरायटिस झाला आहे या कारणाने अत्यंत अस्वस्थ असतात. त्याचे निदान आल्यावर लाेक दुःखी हाेतात. त्यांना असं वाटू लागतं की त्यांची एजिंग प्राेसेस सुरू झाली आहे.
परंतु वास्तव हेच आहे की वृद्धत्व (एजिंग) थांबवता येत नाही. ही एक अशी वास्तविकता आहे, जिचा सामना प्रत्येकाला करावाच लागताे. मात्र, वय वाढल्यामुळे हाेणारा दुखावा इतका वाढू नये की, दैनंदिन कामांवर मर्यादा याव्यात, यासाठी आपण नक्कीच काही उपाय करू शकताे.आधुनिक वैद्यकीय शास्त्राच्या मदतीने वेदनांपासून पूर्ण किंवा माेठ्या प्रमाणात दिलासा मिळू शकताे. तसंच, या आजाराची गती जास्त वेगाने वाढू नये, याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. आपण हा आजार जितका अधिक काळ नियंत्रणात ठेवू शकू, तितकं सांध्यांची शस्त्रक्रिया किंवा गुडघा बदलण्याची (नी-रिप्लेसमेंट) गरज उशिरा भासेल किंवा कदाचित येणारच नाही.ऑस्टिओआर्थरायटिस आणि रुमॅटाॅइडआर्थरायटिस हे आर्थरायटिसचे दाेन मुख्य प्रकार समजले जातात.
रुमॅटाॅइडआर्थरायटिसमध्ये उपचारांचा मुख्य आधार औषधाेपचार असताे. या आजारात साधारणपणे 70 % परिणाम औषधांमुळे, तर 30 % परिणाम व्यायामामुळे हाेताे.याउलट, वयामुळे हाेणाऱ्या ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये व्यायाम हाच सर्वांत प्रभावी उपचार आहे. या प्रकारात 100 % व्यायाम उपयाेगी ठरताे. जर आजार हाेण्याआधीपासूनच नियमितपणे व्यायाम केला, तर ऑस्टिओआर्थरायटिस हाेण्याची शक्यताच कमी हाेते.आणि आजाराची सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात व्यायाम सुरू केला, तर राेग पुढे वेगाने वाढण्यापासून राेखता येताे. म्हणूनच या आजारात व्यायाम हा सर्वांत महत्त्वाचा उपचार मानला जाताे.आजाराची सुरुवात झाली असेल, तर औषधांपेक्षा देखील व्यायामाचे महत्त्व अधिक असते.