प्रशासकीय कामाच्या व्यापातून वेळ काढत अधिकाऱ्यांनी मैदानात गाजवलेले कसब व त्यांना प्राेत्साहन देण्यासाठी खुद्द मंत्र्यांनीच हातात घेतलेली बॅट अशा खेळीमेळीच्या व उत्साहपूर्ण वातावरणात शासनाच्या जलसंपदा विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांना लाेणी बुद्रुक (ता. राहाता) येथे शानदार सुरुवात झाली.विशेष म्हणजे जलसंपदा मंत्री (विदर्भ, तापी व काेकण खाेरे विकास महामंडळ) गिरीश महाजन व जलसंपदा मंत्री (गाेदावरी व कृष्णा खाेरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून खेळात सहभागी हाेत खेळाडूंचा उत्साह द्विगुणित केला.प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या क्रीडांगणावर या स्पर्धांचे आयाेजन करण्यात आले आहे.
स्पर्धेत पुरुष व महिलांसाठी क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ व जलतरण यांसारख्या विविध खेळांचा समावेश आहे. या स्पर्धेचा शुभारंभ केल्यानंतर दाेन्ही मंत्र्यांनी केवळ औपचारिक हजेरी न लावता क्रिकेटच्या खेळपट्टीवर बॅटिंगचे काैशल्य आजमावले.तसेच बुद्धिबळाच्या पटावरही काही वेळ चाल खेळत बाैद्धिक काैशल्याची चुणूक दाखवली.महाजन आणि विखे पाटील यांनी कबड्डीपटू व इतर स्पर्धकांशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव संजय बेलसरे, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सुश्मिता विखे पाटील यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी, विविध जिल्ह्यांतून आलेले खेळाडू व कर्मचारी उपस्थित हाेते.