वणी, 7 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
सप्तशृंग गडावरील सप्तशृंगी देवीच्या नवरात्राेत्सवाची विश्वस्तांमार्फत जय्यत तयारी सुरू असून, काेजागिरी पाैणिमा उत्सवाचीही उत्साहात आणि विविध धार्मिक विधीनुसार तयारी करण्यात येत आहे. गडावर येणाऱ्या भाविकांची गैरसाेय हाेऊ नये यासाठी स्थानिक प्रशासनाकडून पूरेपूर खबरदारी घेण्यात येत आहे. सप्तशृंग गडावर नवरात्राेत्सव यात्रा कालावधीत गडावर हाेणारी गर्दी लक्षात घेता खासगी वाहनांना प्रवेशबंदी असणार आहे. वणीजवळील नांदुरी या पायथ्याच्या गावाजवळून सप्तशृंग गडावर जाता येते. गडावर सप्तशृंगी देवी विराजमान आहे. राज्यभरातून सप्तशृंग गडावर भाविक येत असतात. गडावर थेटपर्यंत वाहने जात असल्याने भाविकांची साेय झाली आहे. काेजागिरी पाैर्णिमा उत्सव 25 ते 26 ऑक्टाेबर या दाेन दिवशी हाेईल. दरम्यान, देवीची पंचामृत महापूजा, घटस्थापना, ललिता पंचमी, दुर्गाष्टमी, हाेम हवन; तसेच काेजगिरी पाैर्णिमेनिमित्त कावडीने आणलेले पाणी घेण्याची वेळ आणि जलाभिषेक महापूजा आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयाेजन हाेईल. नवरात्राेत्सवात भाविकांची माेठी गर्दी हाेत असल्याने गडावर तसेच घाटमार्गात वाहतूक काेंडी हाेऊ नये यासाठी 26 ऑक्टाेबरपर्यंत नांदुरी ते सप्तशृंग गड घाटरस्ता खासगी वाहनांसाठी बंद ठेवण्यात येईल. या कालावधीत भाविकांसाठी 150 बसची व्यवस्था करण्यात आली आहे.