नागपूर, 4 ऑक्टाेबर (आ. प्र.) :
राज्य राखीव पाेलिस दलाच्या (एसआरपीएफ) विदर्भातील जवानांच्या प्रशिक्षणाला आता नवे दालन मिळणार आहे. विदर्भातील सर्व गटांसाठी वर्ध्यात स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली असून, तशा प्रकारचे आदेश पाेलिस दलाला मिळाले आहेत. त्यामुळे नव्याने भरती हाेणाऱ्या पाेलिसांना मूलभूत प्रशिक्षणासाेबतच कार्यरत अधिकारी- अंमलदारांना सेवांतर्गत प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध हाेणार आहे.
राज्य राखीव पाेलिस दलांतर्गत सध्या एकूण 20 गट कार्यरत आहेत. या दलातील पाेलिस अधिकारी व अंमलदारांच्या प्रशिक्षणासाठी सध्या नानवीज (दाैंड) येथे एकमेव प्रशिक्षण केंद्र आहे. या केंद्राची प्रशिक्षण क्षमता आणि नवप्रविष्ट पाेलिस शिपाई, तसेच कार्यरत अधिकारीअंमलदारांची वाढती संख्या लक्षात घेता आणखी एका प्रशिक्षण केंद्राची नितांत गरज हाेती. वर्ध्यात प्रशिक्षण केंद्रासाठी सुमारे 200 एकर जागा उपलब्ध असून, ती हस्तांतरित करण्यास वर्ध्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तत्त्वतः मान्यता दिली आहे. नव्या केंद्रामुळे विदर्भातील पाेलिसांना अधिक व्यापक आणि सातत्यपूर्ण प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध हाेणार आहे.
या प्रशिक्षण केंद्रासाठी एकूण 4466 पदे प्रस्तावित करण्यात आली. यात गट- अ संवर्गातील 53 पदे, गट-ब संवर्गातील 18 पदे, गट-क संवर्गातील 221, गट-ड संवर्गातील 130 पदे, तसेच कंत्राटी/ बाह्ययंत्रणेद्वारे भरल्या जाणाऱ्या 24 पदांचा समावेश आहे. या सर्व पदांच्या वेतनासाठी 26.84 काेटींचा खर्च अपेक्षित आहे. याशिवाय वाहनांसाठी 6.80 काेटी, कार्यालयीन साहित्यासाठी 32.80 लक्ष आणि मूलभूत प्रशिक्षणासाठी आवश्यक साहित्यासाठी 9.76 लक्ष खर्च प्रस्तावित आहे.
प्रशिक्षण केंद्रातील गट-ड आणि बाह्ययंत्रणेद्वारे भरण्यात येणारी पदे ङ्गमनुष्यबळ कंत्राटफ ऐवजी कार्यबल कंत्राट पद्धतीने भरण्यासही शासनाने मान्यता दिली आहे. नव्या प्रशिक्षण केंद्रासाठी आवश्यक मूलभूत प्रशिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.