मुंबई, 28 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
एरवी राज्याला प्रकाशमय ठेवण्यासाठी रात्रंदिवस राबणाऱ्या महावितरणच्या अभियंत्यांनी यंदा संवेदनशीलतेने सामाजिक बांधिलकी जपत भावी पिढीच्या विद्युत सुरक्षेचा नवा अध्याय लिहिला. विद्यार्थ्यांमध्ये विद्युत सुरक्षा, हरित ऊर्जा आणि वीजबचतीबाबत जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने गेल्या पंधरवड्यात या अभियंत्यांनी राज्यातील 2914 शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांत प्रत्यक्ष जाऊन सुमारे 6 लाख 19 हजार विद्यार्थ्यांचे सादरीकरण व थेट संवादाद्वारे प्रबाेधन केले. या विशेष उपक्रमादरम्यान शैक्षणिक संकुलांत विद्युत सुरक्षेचे पाेस्टर्स, फ्लेक्स आणि माहितीपत्रकांद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
विद्युत यंत्रणेविषयी याेग्य माहिती नसल्याने राज्यात मुले आणि विद्यार्थ्यांचे विद्युत अपघात हाेण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. यावर उपाय म्हणून महावितरणने यंदा अभियंता दिन व गणेशाेत्सवाचे औचित्य साधून विद्युत सुरक्षा व हरित ऊर्जा प्रबाेधन अभियान राबवले. यात विद्युत सुरक्षेचे चित्रमय सादरीकरण, माहितीपत्रके आणि विविध प्रात्यक्षिकांसह विजेची निर्मिती व तिचा प्रवास कसा हाेताे, यासह ऊर्जाबचत आणि विकसित भारत 2047 या ध्येयासाठी भावी पिढीला हरित ऊर्जेचे महत्त्व समजून सांगण्यात आले.
राज्यभरातील 2914 शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील सुमारे 6 लाख 19 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांशी 15 ते 30 सप्टेंबर या कालावधीत थेट संवाद साधत महावितरणच्या अभियंत्यांनी साेप्या भाषेत, रंजक प्रसंगांतून आणि चित्रांच्या माध्यमातून विद्युत सुरक्षा, हरित ऊर्जा व ऊर्जा बचत या विषयांवर प्रबाेधन केले. या सादरीकरणानंतर बहुतांश शाळांत विजेचा प्रवास, विद्युत सुरक्षा आणि हरित ऊर्जेबाबत प्रश्नाेत्तरांचे तास रंगले; तसेच अनेक शाळांमध्ये विद्युत सुरक्षेच्या विषयांवर चित्रांमध्ये रंग भरण्याची स्पर्धा घेण्यात आली.
या अभियानातील उल्लेखनीय बाब म्हणजे पुण्यातील द पूना स्कूल अँड हाेम फाॅर द ब्लाईंड या शाळेत अभियंत्यांनी विद्युत अपघाताबाबत अंध विद्यार्थ्यांना आवाज, स्पर्श आणि गंधाद्वारे संभाव्य विद्युत अपघाताचा धाेका कसा ओळखावा, याचे अत्यंत संवेदनशीलतेने प्रात्यक्षिक दिले. संचालक राजेंद्र पवार यांनीही जळगावात विद्यार्थ्यांचे प्रबाेधन केले.
या अभियानात काेकण प्रादेशिक विभागात सर्वाधिक 946 शाळांमध्ये 2 लाख 14 हजार विद्यार्थ्यांना, नागपूर प्रादेशिक विभागात 899 शाळांत 1 लाख 71 हजार विद्यार्थ्यांना, पुणे प्रादेशिक विभागात 827 शाळांत 1 लाख 69 हजार विद्यार्थ्यांना आणि छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभागात 242 शाळांत 65 हजार विद्यार्थ्यांना विद्युत सुरक्षा व हरित ऊर्जेची माहिती दिली. महावितरणमधील अभियंत्यांच्या या सामाजिक संवेदनशीलतेमुळे राज्यात शून्य विद्युत अपघाताच्या दिशेने व विद्युत सुरक्षेच्या जागराचे महत्त्वाचे पाऊल पडले आहे.