नाशिक, 23 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
उत्तर महाराष्ट्राच्या प्रशासकीय सक्षमीकरणाच्या आणि सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत केंद्राने स्वतंत्र नाशिक टपाल क्षेत्राच्या स्थापनेला मंजुरी दिली. या निर्णयामुळे नाशिकसह मालेगाव, धुळे, जळगाव आणि भुसावळ या पाच टपाल विभागांचा समावेश स्वतंत्र प्रादेशिक क्षेत्रात हाेणार आहे.
यामुळे उत्तर महाराष्ट्रातील टपाल सेवा, पार्सल वितरण आणि लाॅजिस्टिक व्यवस्थापन अधिक कार्यक्षम हाेणार आहे. नाशिक, जळगाव आणि धुळे जिल्ह्यांचा भाैगाेलिक विस्तार, वाढती लाेकसंख्या, औद्याेगिक विकास, व्यापारव्यवसायाचा विस्तार; तसेच वाहतूक आणि दळणवळणाच्या वाढत्या सुविधा लक्षात घेता उत्तर महाराष्ट्रासाठी स्वतंत्र टपाल क्षेत्राची आवश्यकता हाेती. यापूर्वी नाशिक आणि मालेगाव हे टपाल विभाग नवी मुंबई टपाल क्षेत्राशी, तर धुळे, जळगाव आणि भुसावळ हे विभाग छत्रपती संभाजीनगर टपाल क्षेत्राशी संलग्न हाेते. उत्तर महाराष्ट्रातील परस्परांशी भाैगाेलिक व आर्थिकदृष्ट्या जाेडलेल्या विभागांचे प्रशासन वेगवेगळ्या प्रादेशिक कार्यालयांमार्फत चालत असल्याने समन्वय आणि कामकाजाच्या दृष्टीने अडचणी निर्माण हाेण्याची शक्यता हाेती. हे लक्षात घेऊन मंत्री छगन भुजबळ यांनी 27 फेब्रुवारी 2025 राेजी केंद्रीय दळणवळण मंत्री ज्याेतिरादित्य सिंधिया यांना पत्र पाठवून स्वतंत्र नाशिक टपाल क्षेत्र स्थापन करण्याची मागणी करून त्याचा पाठपुरावा केला. अखेर केंद्राने या मागणीची दखल घेत स्वतंत्र नाशिक टपाल क्षेत्राला मंजुरी दिली. नव्या निर्णयानुसार नाशिक, मालेगाव, धुळे, जळगाव आणि भुसावळ या पाच टपाल विभागांचा स्वतंत्र नाशिक टपाल क्षेत्रात समावेश करण्यात आला आहे. या अंतर्गत उत्तर महाराष्ट्रातील 230 टपाल कार्यालये आणि 1506 शाखा टपाल कार्यालयांच्या कामकाजाचे संचलन नाशिकमधून केले जाईल.