नाशिक, 14 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
नाशिक व जळगाव जिल्ह्यासाठी वरदान ठरणाऱ्या नार-पार गिरणा नदीजाेड प्रकल्पासाठी 3801 हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. यात 940 हेक्टर वन, 1905 हेक्टर शासकीय जमीन असून, उर्वरित 956 हेक्टर खासगी जमीन आहे. गिरणा नदी खाेरे प्रकल्प विभागाने भूसंपादनाचे प्रस्ताव तयार करून ते जिल्हा प्रशासनाकडे सादर केले आहेत. या प्रकल्पातून नार आणि पार नद्यांचे 10.76 टीएमसी म्हणजे 304.60 दशलक्ष घनमीटर पाणी गिरणा नदीत वळवण्यात येणार आहे.
पावसाअभावी उत्तर महाराष्ट्रात दुष्काळाचे चटके बसत असताना पश्चिमवाहिनी नद्यांचे अरबी समुद्रात वाहून जाणारे पाणी पूर्वेकडील अटीतटीच्या खाेऱ्यात आणण्यासाठी नारपार गिरणा नदीजाेड प्रकल्पाला गती दिली जात आहे. सुमारे साडेसात हजार काेटींच्या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील 4116 काेटींच्या कामांचे कार्यारंभ आदेश मेमध्ये देण्यात आले. भूसंपादन, पुनर्वसन, आरेखन आणि बांधकामाचा यात अंतर्भाव आहे. या टप्प्यात उंबरपाडा, सारन्यावन, प्रतापगड, राक्षसभुवन, मिलन, घाेडी, उखेडमाळ, सावरपाडा, देवमाळ या ठिकाणी नऊ धरणे बांधली जातील. धरणांतून पाणी उचलून ते पूर्वेकडे वाहणाऱ्या गिरणा नदीत साेडले जाईल.
धरणे, बाेगदे आणि कालव्यांच्या माध्यमातून हे पाणी नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात आणले जाणार आहे. गिरणा नदी खाेरे प्रकल्प विभाग आवश्यक त्या परवानग्या मिळवण्यासाठी काम करत आहे. या प्रकल्पासाठी 3801 हेक्टर जमिनीचे भूसंपादन केले जाईल. प्रकल्पामुळे 516 कुटुंबे बाधित हाेतील. त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे.
भूसंपादनाचे प्रस्ताव तयार करून ते जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आल्याची माहिती शाखा अभियंता आर. जे. भालेराव यांनी दिली. या प्रकल्पाविषयी बाधित क्षेत्रात जनजागृती केली जात आहे. या प्रकल्पामुळे स्थानिकांना कसा लाभ हाेईल, याची माहिती दिली जात आहे.
भूसंपादनाचे संपूर्ण क्षेत्र पेसाअंतर्गत आहे. त्यामुळे प्रकल्पास स्थानिक ग्रामपंचायतींची संमती लागणार आहे. त्यांच्याशी संपर्क साधण्याचे काम प्रगतिपथावर आहे.
या याेजनेतून उपलब्ध हाेणाऱ्या 10.76 टीएमसीपैकी साडेनऊ टीएमसी पाणी नाशिक व जळगाव जिल्ह्यांसाठी वापरले जाणार आहे. उर्वरित पाणी धरण परिसरातील स्थानिकांसाठी राखीव ठेवले जाईल. या प्रकल्पातून नाशिक जिल्ह्यातील 25,318 हेक्टर, जळगाव जिल्ह्यातील 17,024 हेक्टर आणि धरणांच्या परिसरातील 7,174 हेक्टर असे एकूण 49,516 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.