महाराष्ट्राच्या चित्ररथाचा दिल्लीत प्रथम क्रमांक

31 Jan 2026 15:08:38
 
Maharashtra
 
नवी दिल्ली, 30 जानेवारी (आ.प्र.) : देशाच्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर पार पडलेल्या दिमाखदार साेहळ्यात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे सादरीकरण सर्वाेत्कृष्ट ठरले. यंदाच्या संचलनात राज्यांच्या चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला. केंद्राकडून या निकालांची घाेषणा करण्यात आली.
 
तसेच जम्मू-काश्मीर आणि केरळने अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला आहे. यंदा महाराष्ट्राने ‘गणेशाेत्सव : आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर केला हाेता.
 
या चित्ररथाच्या माध्यमातून महाराष्ट्राची समृद्ध लाेकसंस्कृती, गणेशाेत्सवाचा सामाजिक वारसा आणि त्यातून मिळणारा आर्थिक राेजगार व आत्मनिर्भरतेचा संदेश प्रभावीपणे मांडला हाेता.
 
चित्ररथावरील भव्य गणेशमूर्ती, पारंपरिक ढाेल-ताशा पथक आणि लेझीम खेळणाऱ्या कलाकारांच्या उत्साहाने कर्तव्यपथ दुमदुमून गेला हाेता.
 
याच प्रभावी सादरीकरणामुळे परीक्षकांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या गटातून महाराष्ट्राच्या चित्ररथाला सर्वाेत्तम चित्ररथ म्हणून निवडले आहे.
 
केवळ राज्यांच्या श्रेणीतच नव्हे, तर इतर विभागांतही चुरस पाहायला मिळाली. यात सेनादलातून नाैदल, तर निमलष्करी दलातून दिल्ली पाेलिसांच्या पथकाला सर्वाेत्कृष्ट म्हणून गाैरवण्यात आले.
 
केंद्रीय मंत्रालयांच्या गटात सांस्कृतिक मंत्रालयाच्या चित्ररथाने बाजी मारली, तर केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वंदे मातरम् नृत्यसमूहाला विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Powered By Sangraha 9.0