संध्यानंद.काॅम भारतीय लक्झरी ब्रँड्स देशातील आघाडीच्या जागतिक फॅशन ब्रँड्सच्या बराेबरीची दरी वेगाने भरून काढत आहेत. हे ब्रँड्स आता त्यांच्या पारंपरिक ब्रायडल वेअर (लग्नाचे कपडे) पलीकडे जाऊन अॅक्सेसरीज आणि दागिन्यांच्या क्षेत्रात आपला विस्तार करत आहेत, ज्यामुळे त्यांना माेठ्या संख्येने तरुण ग्राहक मिळत आहे.
बिझनेस इंटेलिजन्स प्लॅटफाॅर्म टाॅफलर कडील माहितीनुसार, ख्रिश्चन डायर, हर्मेस आणि गुच्ची यांसारख्या भारतात कार्यरत असलेल्या अनेक जागतिक लक्झरी ब्रँड्सनी 2024-25 मध्ये 500 काेटी रुपयांचा महसूल टप्पा ओलांडलेला नाही. याउलट, अनेक भारतीय डिझायनर ब्रँड्स या महत्त्वाच्या टप्प्याच्या अगदी जवळ पाेहाेचले आहेत.
हर्मेस इंडिया रिटेल आणि डिस्ट्रिब्यूटर्स प्रायव्हेट लिमिटेडने 2025 आर्थिक वर्षात 428 काेटी रुपयांचा महसूल नाेंदवला असून, त्यात वार्षिक 35.4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, गुच्चीच्या स्थानिक विक्रीमध्ये 17.3 टक्क्यांची घट आहे. तसेच ख्रिश्चन डायर ट्रेडिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचा महसूल 3.2 टक्क्यांनी घसरून 257 काेटी रुपयांवर आला आहे. स्वदेशी ब्रँड्सची प्रगती, परदेशी ब्रॅण्ड्ससाठी माेठी स्पर्धाच ठरत आहे. याउलट, अनेक भारतीय डिझायनर ब्रँड्सनी विक्रीमध्ये माेठी वाढ नाेंदवली असून, जागतिक स्पर्धकांशी असलेला व्यवसायातील फरक कमी केला आहे.
मनीष मल्हाेत्रा यांच्या लेबलने 2025 या आर्थिक वर्षात 308.3 काेटी रुपयांचा व्यवसाय केला, जाे मागील वर्षातील 229 काेटींच्या तुलनेत 34.6 टक्क्यांनी अधिक आहे. मल्हाेत्रांनी नुकतेच ‘एमएम अॅक्सेसरीज’ नावाचे हँडबॅग कलेक्शन लाँच केले आहे.
डिझायनर सव्यसाची मुखर्जी यांनी पूर्वी सांगितले हाेते की, त्यांचे लेबल 500 काेटी रुपयांच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे.त्यांच्या दागिन्यांच्या व्यवसायाने यावर्षी 100 काेटींचा टप्पा ओलांडणे अपेक्षित आहे, तर अॅक्सेसरीज विभाग सुमारे 60 काेटींपर्यंत पाेहाेचू शकताे.
मनीष मल्हाेत्रा देखील या महिन्याच्या अखेरीस हाय-एंड दागिन्यांची श्रेणी लाँच करणार आहेत. युराेमाॅनिटर इंटरनॅशनलच्या अहवालानुसार, भारत हा जागतिक स्तरावर वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांपैकी एक आहे. 2025 मध्ये भारतीय लक्झरी बाजारपेठेचे मूल्य सुमारे 1.09 लाख काेटी रुपये हाेण्याचा अंदाज आहे.