अत्याधुनिक अग्निशमन वाहनाचे पुनर्जतन

30 Jan 2026 18:27:41

vehicle
 
मुंबई, 29 जानेवारी (आ.प्र.) : सन 1937 मध्ये निर्मित आणि 1944 मध्ये मुंबई बंदरातील (मुंबई डाॅक) मालवाहू जहाजाला लागलेली आग आटाेक्यात आणण्यात माेलाची भूमिका बजावणाऱ्या ऐतिहासिक टर्न टेबल शिडी वाहनाचे मुंबई अग्निशमन दलाकडून पुनर्जतन करण्यात आले आहे. पुनर्जतन केलेल्या या ऐतिहासिक वाहनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रजासत्ताकदिनी महापालिका मुख्यालयात लाेकार्पण करण्यात आले.

टर्न टेबल शिडी असलेल्या या ऐतिहासिक अग्निशमन वाहनाची 1937 मध्ये इंग्लंडमधील लेलँड कंपनीत निर्मिती करण्यात आली हाेती. 24 सप्टेंबर 1941 राेजी मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यात ते समाविष्ट करण्यात आले. तत्कालीन उंच इमारती, गाेदामे; तसेच बंदर परिसरातील उंच भागांपर्यंत पाेहाेचण्यासाठी ही अत्याधुनिक शिडी मानली जायची. ही शिडी पूर्णत: लाेखंडी संरचनेत तयार करण्यात आली हाेती. ती हाताने, साध्या यांत्रिक पद्धतीने फिरवता यायची. 14 एप्रिल 1944 राेजी मुंबई बंदरात उभ्या असलेल्या एस. एस. फाेर्ट स्टिकिन या मालवाहू जहाजाला आग लागली हाेती.

दारुगाेळा, स्फाेटके, इंधन आणि युद्धसामग्रीने हे जहाज भरलेले हाेते. त्यामुळे जहाजावरील आगीने राैद्ररूप धारण केले. अशा भीषण स्थितीत मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी टर्न टेबल शिडी असलेल्या वाहनाच्या साह्याने बचावकार्य केले. या दुर्घटनेत अनेक लाेक मृत्युमुखी पडले हाेते. मात्र, मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांच्या आटाेकाट प्रयत्नांमुळे अनेकांचे प्राणही वाचले.
हे वाहन कालांतराने नादुरुस्त झाले आणि त्यास स्मृतिरुपात दलाच्या मुख्यालयी म्हणजेच भायखळा अग्निशमन केंद्रात जतन करून ठेवण्यात आले. दरम्यान, या वाहनाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन आयु्नत भूषण गगराणी यांनी त्याच्या पुनर्जतनाची संकल्पना मांडली; तसेच प्रसिद्ध उद्याेजक गाैतम सिंघानिया यांच्या सहकार्यातून या वाहनाला नवी झळाळी देण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
जे. के. इन्व्हेस्टर बाॅम्बे लिमिटेड या कंपनीने या वाहनाची दुरुस्ती केली. आता हे वाहन रस्त्यांवर दिमाखात धावण्यास सज्ज झाले आहे.  
 
Powered By Sangraha 9.0