अजितदादांना साश्रू नयनांनी अखेरचा निराेप

    30-Jan-2026
Total Views |
 
Ajit Pawar
 
बारामती, 29 जानेवारी (आ.प्र.) : राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री असलेल्या अजित पवारांचे काल (28 जानेवारी) विमान अपघातात निधन झाले.
 
आज (29 जानेवारी) त्यांच्यावर बारामती येथील विद्याप्रतिष्ठान मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
या वेळी अजित पवार यांचे काका आणि देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्रातील लाखाेंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित हाेते. अजित पवारांच्या अनाकलनीय निधनामुळे संपूर्ण राज्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
 
पुण्यातील बारामती तालुक्यातील निरावागज, पणदरे, करंजेपूल (साेमेश्वर) आणि सुपा या गावांत बुधवारी सकाळी अजित पवारांच्या प्रचारसभांचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यासाठी सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी अजित पवार यांच्या विमानाने मुंबईहून उड्डाण केले.
 
मात्र, सकाळी पावणेनऊच्या सुमारास हे विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी आधीच काेसळले आणि आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या अपघातात अजित पवार यांच्यासह वैमानिक कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठक, पवार यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) दिली.