उपमुख्यमंत्री हा भविष्यात मुख्यमंत्री हाेत नाही हा दुर्दैवी याेगायाेग कायम

29 Jan 2026 21:39:33
 

CM 
 
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे बुधवारी (28 जानेवारी) विमान अपघातात निधन झाले. या अपघाताने महाराष्ट्राच्या केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक जीवनावरही शाेककळा पसरली आहे. राज्याच्या राजकारणात एक दिलखुलास, स्पष्टवक्ता, राेकठाेक आणि कार्यकर्त्यांना प्रिय असलेला नेता अशी अजित पवार यांची ओळख हाेती. त्यांनी राज्याचे नेतृत्व करावे, अशी त्यांची क्षमता हाेती आणि कार्यकर्त्यांची इच्छादेखील हाेती. मात्र, नियतीपुढे काेणाचेच काही चालत नाही, याचा प्रत्यय या अपघाताच्या निमित्ताने पुन्हा एकदा आला आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्राच्या सत्ताकारणाचा इतिहास पाहिला तर उपमुख्यमंत्री झालेला नेता भविष्यात मुख्यमंत्री हाेत नाही, हा दुर्दैवी याेगायाेग अजित पवार यांच्या निधनामुळे अधाेरेखित झाला आहे.
 
वेगाने काम करण्याची पद्धत, प्रशासनावरील पकड आणि कार्यक्षम मंत्री म्हणून अजित पवार यांची ओळख हाेती. राज्याच्या प्रश्नांचा, विविध भागांचा, खात्यांचा, क्षेत्रांचा त्यांचा सखाेल अभ्यास हाेता. बारामती ही त्यांची जन्मभूमी आणि पहिली राजकीय कर्मभूमीदेखील हाेती. त्याच भूमीत त्यांना नियतीने गाठले, हा देखील एक विचित्र याेगायाेग आहे.महाराष्ट्रात गेल्या 66 वर्षात आतापर्यंत 10 नेत्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळाले आहे. मात्र,त्यापैकी एकही जण भविष्यात मुख्यमंत्री पदापर्यंत पाेहाेचू शकला नाही. अत्यंत कमी कालावधीसाठी नासिकराव तिरपुडे तर अजित पवार हे सर्वाधिक वेळा आणि सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री राहिले आहेत. पण, जे आधी उपमुख्यमंत्री हाेतात, त्यांना भविष्यात मुख्यमंत्री हाेता आलेले नाही. अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे पुन्हा एकदा या विचित्र आणि दुर्दैवी याेगायाेगाबाबत चर्चा सुरू झाली आहे.
 
नासिकराव तिरपुडे हे 1978 मध्ये काँग्रेसचे वसंतदादा पाटील हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.त्यांच्या मंत्रिमंडळात भंडाऱ्याचे आमदार नासिकराव तिरपुडे यांना उपमुख्यमंत्री म्हणून स्थान मिळाले.पण तिरपुडे हे केवळ 3 महिने उपमुख्यमंत्रीपदावर राहू शकले. कारण, 1978 मध्येच शरद पवार यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर तिरपुडे यांना पायउतार व्हावे लागले. ते काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हाेते पण, मुख्यमंत्री हाेऊ शकले नाहीत.मुख्यमंत्री शरद पवार यांनी आपल्या मंत्रिमंडळात बीडमधील माेठे नेते सुंदरराव साेळंके यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद साेपवले हाेते. साेळंके जवळपास वर्षभराहून अधिक काळ या पदावर राहिले. मात्र, पवारांनी पद साेडले तेंव्हा साेळंके देखील बाजूला झाले. राज्याच्या राजकारणात 1983 मध्ये बरेच बदल हाेत काँग्रेसचे वसंतदादा पाटील हे पुन्हा मुख्यमंत्री झाले. त्यांनी रामराव आदिक यांना उपमुख्यमंत्री केले.
 
प्रसिद्ध वकील आणि मुंबईतील काँग्रेसचे माेठे नेते असलेले आदिक हे 1985 पर्यंत ते उपमुख्यमंत्री पदावर राहिले.1995 मध्ये महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपचे युतीचे सरकार स्थापन झाले. तेंव्हा शिवसेनेला मुख्यमंत्रीपद तर भाजपला उपमुख्यमंत्रीपद मिळाले हाेते. मुख्यमंत्री मनाेहर जाेशी यांच्या मंत्रीमंडळात भाजपकडून गाेपीनाथ मुंडे यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले. पुढे मनाेहर जाेशी यांनी राजीनामा दिल्यानंतर नारायण राणे हे मुख्यमंत्री झाले पण, गाेपिनाथ मुंडे पूर्ण काळ या पदावर राहिले. पुढे 1999 नंतर युतीचे सरकार राज्यात सत्तेवर आले नाही. 2014 मध्ये गाेपीनाथ मुंडे हे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या मंत्रीमंडळात केंद्रीय मंत्री झाले, पण दुर्दैवी अपघातात त्यांचेही निधन झाले.1999 मध्ये महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यावेळी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद तर राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपद मिळाले. ती जबाबदारी छगन भुजबळ यांच्याकडे साेपवण्यात आली हाेती. पुढे विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये देखील भुजबळ हे उपमुख्यमंत्री हाेते. पण, ते देखील आत्तापर्यंत मुख्यमंत्रीपदापर्यंत पाेहाेचू शकलेले नाहीत.
 
2003 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या काेट्यातून राजकारणावर चांगले वर्चस्व असलेल्या विजयसिंह माेहिते-पाटील यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले हाेते. ते 2004 पर्यंत या पदावर राहिले. पुढे 2014 मध्ये ते माढा लाेकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले हाेते.2004 मध्ये आर. आर. पाटील यांच्यावर उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली हाेती.सांगली जिल्ह्यातील माेठे नेते, शरद पवार यांचे विश्वासू अशी त्यांची ओळख हाेती. मात्र, 2008 मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला हाेता. त्यानंतर पुन्हा काही काळासाठी छगन भुजबळ यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी साेपविण्यात आली हाेती.2010 मध्ये अजित पवार पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाले. या पदावर राहण्याचा एक आगळा विक्रम त्यांच्या नावावर नाेंदविला गेलेला आहे. त्यांनी पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस,उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम केले. अजित पवार यांनी अनेकवेळा मुख्यमंत्री हाेण्याची इच्छा व्यक्त केली तरी नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळेच हाेते, आणि तशी राजकीय समीकरणे कधीच जुळून येऊ शकली नाहीत.
Powered By Sangraha 9.0