सगळं कुटुंब मिळून कुठे जेवायला गेलं किंवा एखाद्या दिवशी बाहेरून जेवण मागवलं तर घरातल्या ज्येष्ठांचा, खासकरून ज्येष्ठ महिलांचाच सूर असा असताे की बापरे बाप, किती महाग असतात हे पदार्थ हाॅटेलांमध्ये? यापेक्षा घरी बनवलं असतं तर किती स्वस्त पडलं असतं. शिवाय जास्त हेल्दी आणि बाई सुगरण असेल तर अधिक चविष्ट पदार्थ आपणच बनवले असते, असं ती आवर्जून हळहळते. घरचं जेवण हेल्दी असतं, हे काही प्रमाणात खरं असेलही- पण ते स्वस्त कसं पडतं? खासकरून बायकांना ते स्वस्त कसं वाटतं, हा एक विचार करण्याचा मुद्दा आहे.
बहुतेक सगळ्याच बायका, खासकरून गृहिणी असलेल्या स्त्रिया स्वयंपाकात आपल्या कामाची, आपण देत असलेल्या वेळेची, आपल्या पाककाैशल्याची काहीएक किंमत असते, हेच मानत नाहीत, ते कधी माेजतच नाहीत. गृहिणींना वाटतं की पुरुष बाहेर पडून पैसे कमावत असतील, तर आपण घरातली कामं करून त्यांना साथ दिली पाहिजे, त्यात पैशांचा हिशाेब कसा करायचा? पण, अनेकदा पुरुषांच्या बराेबरीने नाेकरी करून अर्थार्जन करणाऱ्या बायकांनाही स्वयंपाक हेही आपलं ‘बिनमाेलाचं आणि आवश्यक’ कर्तव्यच आहे, असं वाटतं, हे वाईट. आजकाल पुरुषही बायकांना स्वयंपाकात मदत करू लागले आहेत, हा एक माेठा दिलासा आहे.