तरुण पिढी ऑफिसमधील नियम स्वतः ठरवणार

26 Jan 2026 16:34:20
 
 

office 
 
मागच्या आठवड्यात, ‘इंटरनॅशनल वर्कप्लेस ग्रुप’ या जागतिक आघाडीच्या संस्थेने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, पुढील दाेन दशकांत कार्यपद्धतीचे स्वरूप पूर्णपणे बदललेले असेल. 2010 ते 2024 दरम्यान जन्मलेली ‘जेन अल्फा’ पिढी जेव्हा नाेकरी-व्यवसायांची सुरुवात करेल, तेव्हा त्यांच्या ऑफिसचे स्वरूप त्यांच्या पालकांनी पाहिलेल्या ऑफिसपेक्षा पूर्णपणे वेगळे असेल.हा अभ्यास जरी ब्रिटन आणि अमेरिकेतील 11 ते 17 वयाेगटांतील 1,000 मुलांवर आणि त्यांच्या पालकांवर आधारित असला, तरी त्याचे निष्कर्ष जगभरातील विकसनशील देशांसाठी लागू हाेतात.हायब्रीड काम (घरून आणि कार्यालयातून) ही केवळ अपवादात्मक बाब न राहता ताे तरुण कर्मचाऱ्यांसाठी एक नियम बनेल, ही अल्फा पिढीची सर्वांत माेठी अपेक्षा असेल. केवळ 29% मुलांनी सांगितले की, ते कार्यालयात जाण्यासाठी 30 मिनिटांपेक्षा जास्त प्रवास करण्यास तयार आहेत. याउलट, 81% मुलांनी सांगितले की, त्यांना कामाची कार्यक्षमता आणि चांगल्या मानसिक आराेग्यासाठी कॅफे, काे-वर्किंग स्पेसेस किंवा घराच्या जवळून काम करायला आवडेल.
 
आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे 88% अल्फा पिढीला दरराेज राेबाेट आणि एआयसाेबत काम करण्याची अपेक्षा आहे. 33% मुलांना ई-मेलची जागा घेणारी अधिक स्मार्ट आणि प्रगत साधने हवी आहेत, जसे की 3डी मीटिंगसाठी ‘व्हीआर’ (व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी) हेडसेट. या पिढीमध्ये 4 दिवसांच्या कामाच्या आठवड्याबाबतही एकमत आहे, कारण यामुळे त्यांचे शारीरिक आणि मानसिक आराेग्य सुधारण्यास आणि प्रदूषणाचा परिणाम कमी करण्यास मदत हाेईल, असे त्यांना वाटते.सध्याच्या कर्मचाऱ्यांना कदाचित ही कार्यसंस्कृती काल्पनिक वाटेल. परंतु, काही दशकांपूर्वी ई-मेल ही संकल्पानाही काही जणांना कालबाह्य वाटत हाेती.
त्यांना, तातडीने संपर्क साधणाऱ्या माध्यमाची जास्त गरज हाेती. याच पद्धतीने, काही काळानंतर ‘काॅन्फरन्स काॅल’ नव्या पिढ्यांना कालबाह्य वाटेल व ते ‘व्हीआर’ हेडसेट्सवर मीटिंग करू शकतील.
 
अल्फा पिढीसाठी एआय हे ‘सायन्स फिक्शन’ नसेल, तर ताे त्यांच्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग असेल. त्यांना एआय साधनांची मदत घेताना लाज वाटणार नाही, उलट ते त्याला निर्णय प्रक्रियेतील एक महत्त्वाचा सहकारी मानतील.आधीच्या काही पिढ्या मानवी कष्टांवर आधारित कामे करत हाेत्या. एआयच्या माध्यमातून मिळणाऱ्या प्रत्येक तांत्रिक साेयीची मागणी, नवी तरुण पिढी ऑफिसकडून करेल. प्रत्येक माेठ्या वळणावर, कामगारांच्या गरजा आणि बदलत्या काळानुसार कार्यसंस्कृती बदलावी लागली आहे.औद्याेगिक क्रांतीच्या काळात युनियनच्या दबावामुळे कामाचे तास निश्चित झाले, तर 20 व्या शतकाच्या सुरुवातीला ऑफिसमध्ये नियमांच्या आधारे कामाला सुरुवात झाली. पाच दिवसांचा आठवडा, ही संकल्पना व्यावसायिकांनी आणली नसून कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी सुरू केली.
 
मागच्या दशकापासून कामाचे ठिकाण (ऑफिस) हे एकच ठिकाण असावे, हा निबंध तंत्रज्ञानामुळे दूर झाला. लॅपटाॅप व इंटरनेटच्या सुविधेमुळे, महिला माेठ्या संख्येने काम करू लागल्या. त्यांना, अनेक सुविधा मिळत असल्या तरी दुष्परिणाम हा झाला की, कामाच्या तासांवर मर्यादा राहिली नाही. मागच्या 5 वर्षांतील बदलांमुळे कंपन्यांना त्यांच्या धाेरणांवर पुनर्विचार करण्यास भाग पाडले आहे. आराेग्य, समताेल आणि मानसिक शांतता या विषयांवर तरुण पिढीने दिलेल्या जाेरामुळे कार्यसंस्कृती अधिक लवचिक झाली आहे.आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अहवालाचा संदेश स्पष्ट आहे : 2040 पर्यंत मालक किंवा कंपन्या अटी ठरवणार नाहीत, तर कर्मचारी ठरवतील. ज्या कंपन्या लवचिकता, एआय एकत्रीकरण आणि स्मार्ट टूल्स देण्यास अपयशी ठरतील, त्यांना नवीन कर्मचारी मिळणे अशक्य हाेईल.
Powered By Sangraha 9.0