दावाेसमध्ये वर्ल्ड इकाॅनाॅमिक फाेरममध्ये आतापर्यंत एकूण 37 लाख काेटींचे सामंजस्य करार करण्यात आले असून, त्यातून राज्यात 43 लाख युवक- युवतींना राेजगाराच्या संधी उपलब्ध हाेणार आहेत. त्यामुळे दावाेस दाैरा शंभर टक्के यशस्वी ठरल्याची माहिती उद्याेगमंत्री उदय सामंत यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.दावाेसमध्ये एकूण 81 करार झाले असून, त्यांपैकी 16.69 लाख काेटींचे 51 करार उद्याेग क्षेत्रातील आहेत. एमएमआरडीए अंतर्गत 24 करार असून, त्यांची किंमत 19.43 लाख काेटी आहे, तर सिडकाे अंतर्गत 6 करार 1.15 लाख काेटींचे करार आहेत. एकूण गुंतवणुकीपैकी सरासरी 80 टक्के थेट परकीय गुंतवणूक राज्यात येणार आहे, असे सामंत यांनी स्पष्ट केले. मागील वर्षी दावाेसमध्ये झालेल्या 15 लाख काेटींच्या सामंजस्य करारांची माेठ्या प्रमाणात अंमलबजावणी सुरू आहे.
गडचिराेली, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, रायगड आदी जिल्ह्यांत प्रत्यक्ष उद्याेग उभे राहात असल्याचे सामंत यांनी सांगितले.दावाेस दाैऱ्यात ऑटाेमाेबाईल, रिअल इस्टेट, संरक्षण, फार्मा अशा सर्व क्षेत्रांतील गुंतवणूक राज्यात येणार असून, तिसऱ्या मुंबईतील रायगड - पेण ग्राेथ सेंटरसाठी एक लाख काेटींच्या गुंतवणुकीचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय ‘एमएमआर’ क्षेत्रात सुमारे 23 लाख काेटी, मल्टिपल लाेकेशन्समध्ये 7.72 लाख काेटी, काेकणात 3.10 लाख काेटी, नागपूरमध्ये 1.95 लाख काेटी, नाशिकमध्ये 30,100 काेटी, छत्रपती संभाजीनगरमध्ये 17700 काेटी, पुण्यात 3250 काेटी आणि अमरावतीत 1000 काेटींची गुंतवणूक प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितले.