यंदाच्या प्रजासत्ताक दिन साेहळ्यासाठी नवी दिल्ली सज्ज झाली आहे. राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ला 150 वर्षे पूर्ण हाेत असल्याच्या निमित्ताने यंदा हा साेहळा ऐतिहासिक ठरणार आहे. या भव्य संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ ‘गणेशाेत्सव : आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ या संकल्पनेतून राज्याची परंपरा आणि आर्थिक श्नतीचे दर्शन जगाला घडवणार आहे.संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी या साेहळ्याच्या तयारीची माहिती दिली.यंदाच्या साेहळ्याला युराेपियन काैन्सिलचे अध्यक्ष अँटाेनियाे काेस्टा आणि युराेपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वाॅन डेर लेयन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत कर्तव्यपथावर भारताच्या लष्करी सामर्थ्यासाेबतच सांस्कृतिक समृद्धीचे प्रदर्शन हाेईल.
यंदाच्या संचलनात सहभागी हाेणाऱ्या एकूण 30 चित्ररथांत राज्याचा चित्ररथ आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. लाेकमान्यटळकांनी सार्वजनिक गणेशाेत्सवातून जी सामाजिक क्रांतीची बीजे पेरली, तीच चळवळ आज आधुनिक भारताला कशी आत्मनिर्भर बनवत आहे, याचे प्रभावी चित्रण यात पाहायला मिळेल. गणेशाेत्सवाच्या माध्यमातून हाेणारी काेट्यवधींची आर्थिक उलाढाल, मूर्तिकार, सजावट कलाकारांना मिळणारा राेजगार आणि त्यातून विणली गेलेली आर्थिक साखळी या चित्ररथातून मांडली जाणार आहे; तसेच महाराष्ट्राची अस्मिता असलेली ढाेल-ताशा पथके आणि सामाजिक एकात्मता यातून एक भारत-श्रेष्ठ भारतचा संदेश दिला जाईल.
लष्करी ताकदीच्या प्रदर्शनात यंदा प्रथमच बॅटल अँरे ही युद्धरचना प्रदर्शित केली जाईल.
यात अर्जुन टँक, टी90 भीष्म, राफेल विमाने आणि स्वदेशी बनावटीच्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचे चित्तथरारक दर्शन घडवले जाईल.
संचलनात 18 लष्करी तुकड्या आणि 13 बँड्ससह एकूण 30 चित्ररथ सहभागी हाेतील. 2500 कलाकारांच्या सांस्कृतिक सादरीकरणाला ऑस्कर विजेते संगीतकार एम. एम. किरावानी यांचे संगीत आणि ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांचा आवाज लाभणार आहे.यंदाचा साेहळ्याला 10000 विशेष पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.यात इस्राेचे शास्त्रज्ञ, लखपती दीदी आणि प्रगत शेतकऱ्यांचा समावेश आहे.नागरिकांच्या सुविधेसाठी राष्ट्रपर्व हे विशेष पाेर्टल आणि अॅप विकसित करण्यात आले असून, तिकीटधारकांसाठी दिल्ली मेट्राेचा प्रवास माेफत ठेवण्यात आला आहे.