एप्रिल 2026 पासून देशातील सुमारे 31 हजार शाळांमधील तिसरीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात नवीन विषयांचा समावेश हाेणार आहे. या नव्या अभ्यासक्रमात मूलभूत गणित (बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार) साेबतच वाचन काैशल्ये, व्याकरण आणि वाक्यरचना अशा भाषिक काैशल्यांबराेबरच आता विद्यार्थ्यांना ‘लँग्वेज माॅडेल्स’, ‘चॅटबाॅट प्राॅम्प्ट्स’ आणि ‘जनरेटिव आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) यांची ओळख करून दिली जाणार आहे.याशिवाय, सरकार सध्याच्या पदवी अभ्यासक्रमांमध्ये - बीए, बीकाॅम, बीएससी आणि इतर विशेष अभ्यासक्रमांमध्ये एआय शिक्षणाचा समावेश करण्यावरही काम करत आहे. नव्या काळातील, एआयवर आधारित नाेकऱ्यांसाठी तयार कर्मचारी वर्ग तयार करता येईल, अशी सरकारची याेजना आहे.
शिक्षकांना प्रशिक्षणाचे आव्हान : ‘विद्यार्थ्यांना एआय शिकवण्यासाठी आपल्याला शिक्षकांपर्यंत पाेहाेचले पाहिजे. देशात 1 काेटीहून अधिक शिक्षक आहेत. त्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल सविस्तर माहिती कशी द्यायची आणि त्यांना कसे तयार करायचे, हे माेठे आव्हान आहे,’ संजय कुमार (सचिव, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग) यांनी सांगितले.‘शाळांच्या अभ्यासक्रमात एआयचा समावेश शक्य तितक्या लवकर करणे आवश्यक आहे. सीबीएसई यावर काम करत आहे आणि एप्रिल 2026 पासून सुरू हाेणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षात तिसरीपासून एआय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे,’ संजय कुमार म्हणाले.
जगभरातील एआय शिक्षणाचा ट्रेंड : एआयमुळे राेजगारांच्या क्षेत्रात हाेणाऱ्या बदलांबद्दल वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर, देशातील हा उपक्रम सुरू झाला आहे. सध्या सुमारे 80 लाख भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रात काम करतात आणि एआयमुळे या क्षेत्रात झपाट्याने नवीन नाेकरीच्या संधीही निर्माण हाेत आहेत.चीनने 2022मध्ये त्यांच्या शाळांच्या अभ्यासक्रमात एआयचा समावेश केला, तर अमेरिकेतील अनेक राज्यांनी बालवर्गापासून ते बारावी पर्यंतच्या शिक्षणात एआय विषय सुरू केले आहेत.‘इतिहासात प्रत्येक वेळी तंत्रज्ञानामुळे राेजगार गमावण्याची भीती निर्माण झाली, मानवजात मात्र नेहमी बदलाच्या परिस्थितीशी जुळवून घेत पुढे गेली आहे.एआयही त्याला अपवाद ठरणार नाही, याेग्य वेळी नव्या पिढीला तयार केले पाहिजे,’ संजय कुमार म्हणतात.
राेजगाराबाबत भीतीवर मात करण्याचे आवाहन : ‘इतिहासात अनेक वेळा अशी भीती व्यक्त झाली, मानवजात नेहमी त्यावर मात करून अधिक मजबूत बनली आहे. अनेक लाेक म्हणतात की, एआय हे वेगळे आहे, आपण कधीही न पाहिलेला हा बदल आहे. पण मला तसे वाटत नाही. माझी मुख्य चिंता वेगळी आहे - सर्वांना एआय समजून घेता आले पाहिजे, विशेषतः शिक्षकांना. जेव्हा लाेक हा विषय समजून घेतील, तेव्हा ते त्याच्याशी जुळवून घेण्याचा मार्ग शाेधतील,’ असे संजय कुमार यांनी एका कार्यक्रमात सांगितले.
या कार्यक्रमात नीती आयाेगाने ‘एआय अर्थव्यवस्थेत राेजगार निर्मितीसाठीचा राेडमॅप’ प्रकाशित केला. कुमार यांनी नीती आयाेग आणि नॅसकाॅमकडून मदत मागितली आहे, जेणेकरून शिक्षकांना प्रशिक्षण देता येईल व एक व्यवहार्य आणि उपयुक्त एआय अभ्यासक्रम तयार करता येईल.‘आपल्याला शिक्षकांपर्यंत पाेहाेचावे लागेल. देशात सुमारे एक काेटीपेक्षा जास्त शिक्षक आहेत. त्यांना एआयबद्दल कसे समजवायचे, त्यांना कसे तयार करायचे, हे माेठे आव्हान आहे,’ असे ते म्हणाले.
एआयचा प्रभाव 20 लाख नाेकऱ्यांवर : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या वापरामुळे भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्रात, जिथे सुमारे 80 लाख लाेक काम करतात, त्यापैकी सुमारे 20 लाख नाेकऱ्या कमी हाेऊ शकतात.पुढील पाच वर्षांत एआयमुळे 40 लाख नवीन नाेकरीच्या संधीही निर्माण हाेऊ शकतात, असे नीती आयाेगाच्या अहवालात म्हटले आहे.‘जर आपण याेग्य वेळीच पाऊले उचलली नाहीत, तर नाेकऱ्या जाणार हे निश्चित आहे. या 20 लाख नाेकऱ्या म्हणजे फक्त त्या व्यक्तींपुरत्या नाहीत, त्या व्यक्ती व नाेकऱ्यांवर अवलंबून असलेले 2 ते 3 काेटी लाेक आहेत कारण उत्पन्न विविध मार्गातून संपूर्ण अर्थव्यवस्थेत फिरते व त्याचा माेठा परिणाम हाेताे,’ बी.व्ही.आर. सुब्रह्मण्यम (मुख्य कार्यकारी अधिकारी, नीती आयाेग) यांनी सांगितले.