सहकार क्षेत्रातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या शासकीय सहकार व लेखा पदविका (जीडीसी अँड ए) आणि सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सीएचएम) परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 26 ते 28 मे या कालावधीत हाेणाऱ्या या परीक्षांसाठी आता पहिल्यांदाच रत्नागिरीत नवीन केंद्र सुरू करण्यात आले आहे. काेकणातील विद्यार्थ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे.काेकण विभागात यापूर्वी ठाणे हे एकमेव परीक्षा केंद्र हाेते. त्यामुळे काेकणातील इतर जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी ठाण्याला जावे लागत असे. मात्र, आता मेच्या परीक्षेसाठी संगणक प्रणालीत रत्नागिरी हे 17 वे नवीन केंद्र सुरू करण्यात आले आहे.
यामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडसाठी पहिल्यांदाच काेणतीही पदवी असलेल्या इच्छुकांना ही परीक्षा देण्यासाठी रत्नागिरीत सुविधा उपलब्ध झाली आहे.या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची मुदत 23 फेब्रुवारीपर्यंत आहे. https://gdca.maharashtra. gov.in या संकेतस्थळावरून उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करावेत. रत्नागिरी येथे केंद्र उपलब्ध झाल्यामुळे उमेदवारांनी आपले अर्ज दाखल करताना केंद्राच्या रकान्यात रत्नागिरी या केंद्राची नाेंद करावी, असे आवाहन केंद्रप्रमुख तथा जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) डाॅ.साेपान शिंदे यांनी केले आहे.