एखाद्या वस्तूची किंमत कशी ठरवायची? लाेकांना वाटतं की ती बनवण्यासाठी येणारा खर्च, ती बनवणाऱ्या माणसाला आवश्यक दैनंदिन उत्पन्न, त्याचं काैशल्य, कारागिरी यांचं माेल हे जाेडून किंमत ठरवली पाहिजे. पण, छाेट्या उत्पादकांच्या बाबतीत आणखी एक अडचण असते. समान उत्पादन बनवणारे ते किती किंमतीला विकतायत, तेही पाहावं लागतं. त्यांच्यापेक्षा फार भाव वाढवता येत नाहीत. हा तिढा कसा सुटताे ते सांगणारी एक गाेष्ट एका बेकरच्या नावाने सांगितले जाते. शहरातले सर्वाेत्तम ब्रेड बनवणारा हा बेकर. शहरभरातून त्याच्याकडे लाेक येत असतात, पण ती मागणी पुरी करण्यासाठी त्याला दिवसाचे 12 तास काम करावं लागतं. त्याला एक माणूस सल्ला देताे की, तुझ्या ब्रेडची किंमत दुप्पट कर. ग्राहक गमावण्याचा धाेका पत्करून ताे हा सल्ला स्वीकारताे. आता काय हाेतं? निम्मे ग्राहक कमी हाेतात, पण किंमत दुप्पट असल्याने उत्पन्न तेवढंच राहतं, उलट खर्चाच्या हिशाेबात वाढतं. सहा तासांत काम निपटतं आणि दाेनेक तास नवे प्रयाेग करायला देता येतात. आणखी नवे ब्रेड तयार करता येतात. तेही उत्तम किंमतीला विकता येतात. एखादी वस्तू प्रीमियम कशी बनते, त्याचं हे उदाहरण आहे. अर्थात त्यातही सगळ्यात महत्त्वाचा आहे ताे दर्जा!