हजारो भाविकांच्या उपस्थितीत दगडूशेठ बाप्पाला भावपूर्ण निरोप

08 Sep 2025 14:15:42
 
dag
 
पुणे, 7 सप्टेंबर (आ.प्र.) :
 
पुणे शहरातील विसर्जन मिरवणुकीचे आकर्षण असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या गणपती बाप्पाला शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास अलोट गर्दीच्या साक्षीने भावपूर्ण निरोप देण्यात आला. दगडूशेठ ट्रस्टचा गणपती सायंकाळी पाचच्या सुमारास मिरवणुकीत दाखल झाला. आकर्षक विद्युत रोषणाईन सजलेला ‌‘श्री गणनायक‌’ रथ आणि रथात विराजमान झालेल्या ‌‘श्री‌’च्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती. बाप्पाची विसर्जन मिरवणूक व बाप्पाचे मोहक रूप मोबाइलमध्ये टिपून घेण्याची भाविकांची लगबग सुरू होती.
 
‘श्रीं‌’च्या रथाला सात बैलजोड्या जोडण्यात आल्या होत्या. प्रथेप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरातून साडेचारच्या सुमारास बाप्पाच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला. मिरवणुकीचा प्रारंभ झाल्यानंतर भाविकांची दर्शनासाठी गर्दी उसळली. बेलबाग चौकात आगमन होताच गणपत्ती बापा मोरया...चा जयघोष करण्यात आला. प्रथेप्रमाणे बेलबाग चौकात आरती झाल्यानंतर मिरवणूक मार्गस्थ झाली.
 
यावेळी गर्दी नियंत्रित करताना पोलिसांची धावपळ उडाली. रात्री आठच्या सुमारास दगडूशेठ ट्रस्टची मिरवणूक टिळक चौकात आली. आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी या चौकात गर्दीचा उच्चांक झाला. तेथे पोलीस आयुक्तांच्या हस्ते विधिवत आरती करण्यात आली. रात्री साडआठच्या सुमारास पांचाळेश्वर घाटावर मोरया मोरयाच्या गजरात ‌‘श्रीं‌’चे विसर्जन करण्यात आले.
Powered By Sangraha 9.0