सहकार हा लोकशाहीचा आत्मा : प्रा. दिगंबर दुर्गाडे यांचे मत

30 Sep 2025 13:46:21
 
 sah
पुणे, 29 सप्टेंबर (आ.प्र.) :
 
‘सहकार हा लोकशाहीचा आत्मा असून, सहकार चळवळीने सर्वसामान्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करत स्वतःच्या पायावर उभे केले आहे,‌’ असे मत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी व्यक्त केले. पतसंस्था व सहकारी बँकांनी निर्माण केलेल्या कल्याणकारी वित्तव्यवस्थेने सर्वसामान्यांची बेकायदा सावकारी शोषणातून मुक्तता केली आहे, असे कौतुकही त्यांनी केले. पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थांच्या सहकारी फेडरेशनची 39 वी वार्षिक सर्वसाधारण सभा छत्रपती शिवाजीनगर येथील रमा रमण कार्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
 
या वेळी जिल्ह्यातील आदर्श पतसंस्थांना स्वर्गीय आमदार शिवाजीराव भोसले आदर्श पतसंस्था पुरस्काराने गौरविण्यात आले. या प्रसंगी प्रा. डॉ. दुर्गाडे बोलत होते. फेडरेशनच्या अध्यक्षा रेश्मा भोसले सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. सहकार तज्ज्ञ काशिनाथ दंडवते, उपाध्यक्ष शामराव हुलावळे, सचिव संतोष भेगडे, माणिकराव झेंडे, जयवर्धन भोसले, विनायक तांबे आदी सर्व संचालक व्यासपीठावर उपस्थित होते. समान उद्दिष्टाने पतसंस्थांना एकजूट करून त्यांच्या सर्वांगीण विकासाचा साकल्याने विचार फेडरेशन करत आहे, असे समाधान प्रा. डॉ. दुर्गाडे यांनी व्यक्त केले.
 
सहकारी पतसंस्थांनी गोरगरीब सभासदांना मालक करून आर्थिकदृष्ट्या सक्षम लोकशाहीचा पाया रचला आहे. आता सहकारी पतसंस्थांनी आर्थिक शिस्त, कॉर्पो रेट कार्यसंस्कृती, नियमांच्या बंधनात काम करून स्वतःच्या क्षमतांचा विस्तार केला पाहिजे, अशा सूचनाही त्यांनी केल्या. रेश्मा भोसले म्हणाल्या, ‌‘पतसंस्था या सहकार चळवळीचा अविभाज्य घटक असून, सहकार संस्कृती जोपासण्याचे काम करणारे आपले फेडरेशन राज्यात आदर्श म्हणून ओळखले जात असल्याचा अभिमान आहे. सहकार हे मी नव्हे आपण हे मूल्य रुजविणारी संस्कृती आहे. फेडरेशनचे संस्थापक दिवंगत आमदार शिवाजीराव भोसले यांनी हे मूल्य पेरले असून, ते जोपासण्याचे कार्य आपल्याला करायचे आहे.
 
सहकार क्षेत्राला प्रभावी दिशादृष्टी देणाऱ्या आमदार शिवाजीराव भोसले यांच्या प्रयत्नांमुळेच सहकार कायद्यात कलम 101 (थकबाकी वसुलीची कायदेशीर प्रक्रिया), कलम 156 (थकबाकी वसुलीचे अधिकार) आणि नियम 107 चा प्रभावी वापर सुरू झाला. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ फेडरेशनने पतसंस्थांना प्रोत्साहनासाठी आमदार शिवाजीराव भोसले आदर्श पतसंस्था पुरस्कार सुरू केला असून, त्यामुळे सहकार क्षेत्रात नवे मापदंड निर्माण झाले आहेत.‌’
 
फेडरेशनचे स्वमालकीचे वास्तुस्वप्न पूर्ण पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थांचे सहकारी फेडरेशनने अध्यक्षा रेश्मा भोसले यांच्या पुढाकारातून छत्रपती शिवाजीनगर परिसरात स्वमालकीची जागा खरेदी केली असून, तिथे लवकरच अत्याधुनिक सोयीसुि वधायुक्त प्रशस्त वास्तू उभारण्यात येणार आहे, अशी घोषणा फेडरेशनचे संचालक विनायक तांबे यांनी केली. पतसंस्थांच्या मागणीनुसार फेडरेशनतर्फे थकीत कर्जवसुलीसाठी आकारण्यात येणारे सेवा शुल्क दोन टक्क्यांवरून दीड टक्के करण्यात आशयाचे त्यांनी सांगितले. सर्व सभासदांनी टाळ्यांच्या कडकडाटात या दोन्ही घोषणांचे स्वागत केले.
Powered By Sangraha 9.0