
महावितरणमध्ये विद्युत सहायकपदी निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी 20 ते 22 ऑगस्टला पूर्ण झाली आहे. तथापि, राज्यातील अतिवृष्टी व पूरस्थिती; तसेच इतर कारणांमुळे गैरहजर असलेल्या काही उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांच्या पडताळणीसाठी 9 व 10 सप्टेंबरला शेवटची संधी देण्यात आली आहे.विद्युत सहायक पदासाठी निवड झालेले उमेदवार व त्यांना वर्ग केलेल्या परिमंडलांची यादी महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली आहे. या उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची व प्रमाणपत्रांची पडताळणी संबंधित परिमंडल कार्यालयांत 20 ते 22 ऑगस्टदरम्यान करण्यात आली. मात्र, या तिन्ही दिवसांत राज्यात अतिवृष्टी तसेचकाही अपरिहार्य कारणांमुळे उपस्थित राहू न शकलेल्या उमेदवारांना मूळ कागदपत्रे व प्रमाणपत्र पडताळणीसाठी आणखी एक संधी देण्यात आली आहे.आता 9 व 10 सप्टेंबरला या उमेदवारांच्या ऑनलाइन अर्जांची छाननी संबंधित परिमंडल कार्यालयांत हाेणार आहे. सकाळी 10 वाजता ही कार्यवाही सुरू हाेईल. त्यासाठी संबंधित उमेदवारांनी स्वतः सर्व मूळ कागदपत्रे व प्रमाणपत्रांसह हजर राहणे आवश्यक आहे. जे उमेदवार पडताळणीसाठी हजर राहणार नाहीत, त्यांची निवड रद्द समजली जाईल, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.