मुंबई, 2 सप्टेंबर (आ.प्र.) :
राज्य शासनाच्या वतीने गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित गझलसम्राट पंडित भीमराव पांचाळे यांची विशेष मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात प्रसारित होणार आहे. दिलखुलास कार्यक्रमात ही मुलाखत बुधवारी (3), गुरुवारी (4), शुक्रवारी (5) आणि शनिवारी (6 सप्टेंबर) सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर; तसेच न्यूज ऑन एआयआर मोबाइल ॲपवर ऐकता येईल. निवेदिका स्मिता गवाणकर यांनी ही मुलाखत घेतली आहे. राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हीरक महोत्सवी सोहळा नुकताच झाला. या सोहळ्यात 60 आणि 61व्या चित्रपट पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि पालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गझल हेच व्रत, गझल हाच ध्यास या मंत्राने रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे पांचाळे यांनी मराठी गझलेला लोकप्रियतेच्या शिखरावर नेले. त्यांच्या स्वरांनी शब्दांना नवी ओळख दिली. मराठी गझल साहित्याला समृद्ध केले. त्यांच्या समृद्ध प्रवासाबद्दल आणि गझलेच्या विविध पैलूंवर त्यांनी या कार्यक्रमात संवाद साधला आहे.