मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मेट्रोच्या पादचारी पुलाचे उद्घाटन

03 Sep 2025 14:27:57
 
mu
 
शनिवार पेठ, 2 सप्टेंबर
(आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
 
पुणे मेट्रोच्या छत्रपती संभाजी उद्यान स्थानकाला शनिवार पेठेशी जोडणाऱ्या पादचारी पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या पुलाची रचना अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असून, हे स्थापत्यकलेचे एक उत्तम उदाहरण आहे. या पुलामुळे पेठांच्या परिसरातील नागरिकांना मेट्रोने प्रवास करणे सुलभ होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. या प्रसंगी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ; तसेच महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
 
पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात वनाज स्थानक ते रामवाडी मार्गावर डेक्कन जिमखाना आणि छत्रपती संभाजी उद्यान यांना पेठ क्षेत्राशी जोडण्यासाठी दोन पुलांची योजना होती. त्यापैकी छत्रपती संभाजी उद्यान ते शनिवार पेठ जोडणारा पूल आता पूर्ण झाला असून, त्याद्वारे शनिवार पेठ, नारायण पेठ आणि परिसरातील नागरिकांना छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्थानक गाठणे सोपे होणार आहे. या पुलाचे वैशिष्ट्य म्हणजे यात भारतातील पहिला 70 अंशात झुकलेला काँक्रीट पाइलन उभारण्यात आला आहे.
 
पुलाचा भार पेलण्यासाठी उच्च क्षमतेच्या 20 केबल्स बसवण्यात आल्या आहेत. पुलाची एकूण लांबी 179.791 मीटर आणि रुंदी 8 मीटर आहे. आधुनिक केबल तंत्रज्ञान वापरून याचे बांधकाम करण्यात आले आहे. नदीच्या प्रवाहाला अडथळा होऊ नये यासाठी नदीपात्रात केवळ दोन खांब उभारले आहेत. तसेच पुलालगतच बालगंधर्व रंगमंदिर असल्याने पुण्याची सांस्कृतिक परंपरा लक्षात घेऊन पुलाची रचना तानपुरा स्वरूपात करण्यात आली आहे. अशाप्रकारे या पुलात अभियांत्रिकी आणि कलेचा सुंदर संगम साधला गेला आहे.
Powered By Sangraha 9.0