‌‘दगडूशेठ‌’च्या अथर्वशीर्ष पठणाची ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्समध्ये नोंद

03 Sep 2025 14:22:05
 
 dag
पुणे, 2 सप्टेंबर (आ.प्र.) :
 
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने ऋषिपंचमीनिमित्त दरवर्षी आयोजिण्यात येत असलेल्या सामुदायिक अथर्वशीर्ष पठण उपक्रमाचा जागतिक विक्रम झाला आहे. 35215 महिलांच्या अथर्वशीर्ष पठण उपक्रमाची नोंद ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स इंग्लंडमध्ये झाली आहे. ट्रस्टच्या 133व्या वर्षीच्या गणेशोत्सवात जागतिक विक्रमाचे प्रमाणपत्र ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्सचे उपाध्यक्ष डॉ. दीपक हरके यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांना प्रदान केले.
 
यावेळी ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरवर्षी ‌‘ओम गं गणपतये नमः‌’ च्या घोषात 35 हजार महिला एकत्र येत हा उपक्रम राबवतात. ऊर्जेने भारलेल्या वातावरणात हजारो महिलांच्या गर्दीचा उच्चांक गणपती बाप्पासमोर पाहायला मिळतो. यात पुण्यासह संपूर्ण जगभरातून महिला सहभागी होतात, हे याचे वैशिष्ट्य असून, यावेळी स्त्रीशक्तीचा जागर होतो. या उपक्रमाचे यंदा 40वे वर्ष असून, यंदा मिळालेला हा सन्मान आनंददायी असल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0