अठरा हजारांवर पुणेकरांच्या छतांवर 91 मेगावॉट वीजनिर्मिती

29 Sep 2025 14:06:44
 
 maha
पुणे, 27 सप्टेंबर (आ.प्र.) :
 
उन्हामुळे घराचे छत तापून एसीचे वीजबिल वाढवण्यापेक्षा त्याच छतावर प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून सौर प्रकल्प साकारून आपले वीजबिल शून्य करण्याचा पर्याय 18694 पुणेकरांनी स्वीकारला आहे. या योजनेतून त्यांना 151 कोटींचे अनुदानही मिळाले असून, 90.62 मेगावॉट वीजनिर्मिती होत आहे. या कुटुंबांची भविष्यातील वीजबिलाची चिंता आता मिटली आहे. घरगुती वीज ग्राहकांना त्यांच्या दरमहाच्या वीजबिलापासून मुक्तता देण्यासाठी; तसेच त्यांना विजेबाबत स्वयंपूर्ण करण्यासाठी पंतप्रधानांनी सूर्यघर योजनेची सुरुवात केली आहे. देशभरात या योजनेतून 5889 मेगावॉट क्षमता विकसित झाली आहे.
 
राज्यात 2 लाख 91 हजार 811 घरांवर प्रकल्प साकारले असून, त्यांची क्षमता 1100 मेगावॉटवर गेली आहे. पुणे परिमंडलातही या योजनेचा टक्का वाढतो आहे. आतापर्यंत 31649 घरगुती ग्राहकांनी सूर्यघरसाठी नोंदणी केली असून, पैकी 18694 घरांवर प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. त्यातून 90.62 मेगावॉट वीजनिर्मिती होत आहे. 7397 प्रकल्पांचे काम अंतिम टप्प्यात आहे. महावितरणच्या पुणे परिमंडलात गणेशखिंड मंडलात 7312, पुणे ग्रामीण मंडल 5146 व रास्ता पेठ मंडलात 6236 प्रकल्प कार्यान्वित झाले असून, त्यांची स्थापित क्षमता अनुक्रमे 38.21, 21.07 व 31.34 मेगावॉट इतकी आहे.
 
अनुदान वितरणातही अनुक्रमे गणेशखिंडमध्ये 6356 लाभार्थ्यांना 62.4 कोटी, पुणे ग्रामीण 4480 लाभार्थ्यांना 36.4 कोटी व रास्ता पेठ मंडलातील 5350 लाभार्थ्यांना 52.58 कोटी असे एकूण 151 कोटींचे अनुदान मिळाले आहे. पुणेकर सूर्यघर योजनेचे महत्त्व जाणतात. त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करून या योजनेत सहभागी व्हावे. महावितरणने ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन केली आहे. अनुदानही तातडीने प्राप्त होते.
Powered By Sangraha 9.0