लाेकलमधील गर्दी कमी हाेणार, फेऱ्या वाढणार : वेळापत्रक बदलणार

27 Sep 2025 22:42:09
 

Local 
 
मुंबई लाेकलच्या नेरूळ-उरण मार्गावरील लाेकलमधील गर्दी कमी हाेणार आहे. या मार्गावर लवकरच सुमारे दीडपट फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. दिवसेंदिवस प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.ऑक्टाेबरमध्ये रेल्वेचे वार्षिक वेळापत्रक बदलत असून, त्यात हा बदल नियाेजित असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.सध्या नेरूळ ते उरणदरम्यान लाेकल गर्दीच्या वेळी अंदाजे एक तास आणि गर्दी नसलेल्या वेळी अंदाजे दीड तासाच्या अंतराने धावतात. बेलापूर ते उरण सेवाही यानुसारच धावते. उरण मार्गावर सध्या दिवसभरात गाड्यांच्या 40 फेऱ्या हाेतात.
 
नवीन वेळापत्रकानुसार त्या फेऱ्या 60 पर्यंत वाढवण्याची याेजना आहे. त्यानुसार अप मार्गावर 30 आणि डाउन मार्गावर 30 सेवा चालवल्या जातील. वाढीव सेवेमुळे दाेन गाड्यांमधील अंतर कमी हाेईल. गरज पडल्यास भविष्यात गाड्यांच्या फेऱ्या दुपटीने वाढवण्यात येणार आहेत.तारघर रेल्वे स्थानक नवी मुंबई विमानतळाच्या अगदी जवळ आहे. हे स्थानक लवकरच खुले हाेईल. तारघर स्थानक बेलापूर आणि बामणडाेंगरी दरम्यान, तर गव्हाण स्थानक खारकाेपर व शेमाटीखार दरम्यान बांधले आहे. परिणामी प्रवाशांची गर्दी वाढणार असल्याने गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्यात येतील. दरम्यान, अतिर्नित 15 डब्यांच्या लाेकल सुरू करण्याची याेजना असल्याचेही सांगण्यात आले.
Powered By Sangraha 9.0