राज्यात अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने नद्यांना पूर आला आहे.पिकांचे नुकसान झाले असून, जमीन खरडून गेली आहे. या संकटकाळात राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, सर्व निकष बाजूला ठेवून सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत केली जाईल. दिवाळीपूर्वीच ही मदत शेतकऱ्यांना वितरित करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.मुख्यमंत्र्यांनी औसा तालुक्यातील उजनी आणि निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथे अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची माहिती घेतली.
जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भाेसले, खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर, आमदार सर्वश्री अभिमन्यू पवार, संजय बनसाेडे, रमेश कराड, राणा जगजितसिंह पाटील, कैलास पाटील, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पाेलीस अधीक्षक अमाेल तांबे, विभागीय आयु्नत जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल मीना, बीड पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता आय. एम. चिश्ती उपस्थित हाेते.
मुख्यमंत्र्यांनी औसा ते तुळजापूर महामार्गावरील पुलावरून तेरणा पात्राची, नदीला आलेल्या पुरामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.
त्यानंतर उजनी गावालगत असलेल्या तेरणा नदीपात्राची व पुरामुळे गावातील घरे, दुकानांच्या नुकसानीची पाहणी केली.महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर तेरणा आणि मांजरा नदीच्या संगमावर असलेल्या औराद शहाजानी येथील नुकसानग्रस्त भागाची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. ग्रामस्थांनी मूग, उडीद, मका, साेयाबीन आदी पिकांच्या नुकसानीची माहिती दिली. नुकसान झालेल्या भागातील पंचनाम्याची कार्यवाही सुरू आहे. ज्या भागात पाणी शिरले अशी नाेंद आहे पण तेथे पाेहाेचणे शक्य नाही, अशा ठिकाणी ड्राेनद्वारे करण्यात आलेला पंचनामाही ग्राह्य धरण्यात येईल तसेच माेबाइलवरील फाेटाेही स्वीकारण्यात येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.