पुणे, 26 सप्टेंबर
(आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
भारतीय जनता पार्टीच्या वतीने आगामी तमिळनाडू, पश्चिम बंगाल आणि बिहार निवडणुकीसाठी प्रभारी आणि सह-प्रभारी यांच्या नावांची घोषणा करण्यात आली असून, यात पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची तमिळनाडू भाजपच्या निवडणूक सह-प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भातील घोषणा नवी दिल्ली येथील मुख्यालयातून पार्टीचे सचिव खासदार अरुण सिंह यांनी केली. पुढील वर्षीच्या एप्रिलमध्ये तमिळनाडू विधानसभेची मुदत संपत असून, त्याच आसपास तमिळनाडू विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.
दक्षिणेतील मोठे राज्य असलेल्या तमिळनाडूकडे भारतीय जनता पार्टीने विशेष लक्ष केंद्रित केले असून, निवडणुकीच्या सात महिने आधीच प्रभारी आणि सह-प्रभारी यांच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या नियुक्तीनंतर मुरलीधर मोहोळ म्हणाले, की मी भारतीय जनता पार्टीचा समर्पित आणि पूर्ण क्षमतेने कार्यरत असणारा कार्यकर्ता आहे. आजवर पार्टीने दिलेली प्रत्येक जबाबदारी ही पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे.