बीड जिल्ह्यातील काही भागांत मुसळधार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील नद्यांना आलेल्या पुरामुळे नदीकाठावरील अनेक गावांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही गावांत नदीचे पाणी घरांत व शेतशिवारात घुसल्याने नागरिकांचे माेठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालक मंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाचा दाैरा केला. पवार यांनी बीड तालुक्यातील पिंपळगाव घाट, हिंगणी खुर्द, आहेर चिंचाेली, खामगाव, नांदूर हवेली, शिरूर कासार तालुक्यातील खाेकरमाेहा आणि येवलवाडी आणि गेवराई तालुक्यातील इटकूर या गावांना भेट देऊन तेथील पाऊस व पुरामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. पवार यांनी नागरिकांशी संवाद साधला.या दाैऱ्यात पवार यांनी चाैसाळा ते पिंपळघाट राेडवरील अनुसया नदीवरील वाहून गेलेल्या पुलाची पाहणी केली; तसेच संबंधित विभागास नवीन पूल तयार करण्याचे निर्देश दिले.