तुम्हाला दिवसभर फ्रेश ठेवणारी फळे

26 Sep 2025 23:53:11
 
 

Health 
 
फळे खाणे हे शरीरासाठी नेहमीच उपयुक्त मानले गेले आहे. त्यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, तंतुमय पदार्थ, नैसर्गिक साखर आणि पाण्याचे प्रमाण भरपूर असते.त्यामुळे शरीराला ताजेतवानेपणा, ऊर्जा आणि आवश्यक पाेषण मिळते. फळे खाल्ल्याने दिवसभर फ्रेश वाटण्याचे कारण म्हणजे त्यांची सहज पचण्याची क्षमता आणि त्यातून मिळणारा त्वरित ऊर्जा पुरवठा. सकाळी रिकाम्या पाेटी किंवा नाश्त्याच्या आधी फळे खाल्ल्यास त्यांचा फायदा जास्त हाेताे. कारण झाेपेमुळे शरीर रात्रीभर अन्न न खाल्ल्याने रिकामे हाेते, त्यावेळी फळातील पाेषक घटक लगेच शाेषले जातात. सफरचंद, केळे, पपई, द्राक्षे, संत्री अशी फळे सकाळी खाल्ल्यास पचनास मदत हाेते आणि दिवसभर उत्साह टिकून राहताे. दुपारच्या जेवणानंतर त्वरित फळे खाणे याेग्य नसते.
 
जेवणातील अन्न पूर्णपणे पचायला वेळ लागताे, त्याचवेळी फळे खाल्ल्यास गॅस, फुगवटा किंवा जडपणा जाणवू शकताे. त्यामुळे जेवणानंतर दाेन-तीन तासांनी हलकी फळे खाल्ली तर ती स्नॅकसारखी उपयाेगी ठरतात आणि थकवा दूर करतात. सायंकाळच्या वेळी फळांचा वापर केल्यास शरीराला ताजेपणा मिळताे. कामाच्या किंवा प्रवासाच्या थकव्यानंतर पेरू, डाळिंब, किवी, स्ट्राॅबेरी यांसारखी फळे खाल्ली तर ऊर्जा परत मिळते आणि रात्रीच्या जेवणापर्यंत भूकही चांगली लागते. मात्र खूप उशिरा रात्री फळे खाणे टाळावे, कारण त्या वेळेला पचनक्रिया मंदावलेली असते. फळांमधील नैसर्गिक ग्लुकाेज आणि फ्रुक्टाेज हे रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवतात.
 
जीवनसत्त्व सी असलेली संत्री, माेसंबी, डाळिंब यामुळे थकवा कमी हाेताे. सफरचंद, केळे किंवा द्राक्षे त्वरीत ऊर्जा देतात, त्यामुळे सकाळी किंवा व्यायामानंतर त्यांचा उपयाेग अधिक हाेताे.पपई, आंबा किंवा पेरू यांसारखी फळे पचन सुधारतात, त्यामुळे ती दिवसाच्या मधल्या वेळेत चांगली ठरतात. फळे दिवसभर फ्रेश ठेवतात यामागचे गुपित म्हणजे त्यातील भरपूर प्रमाणातील पाणी आणि तंतू. हे घटक शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत करतात, पाेट हलके ठेवतात आणि मेंदूला सतत ऊर्जा पुरवतात.
त्यामुळे मनही प्रसन्न राहते आणि एकाग्रता वाढते.एकूणच, फळे याेग्य वेळेत आणि याेग्य प्रमाणात खाल्ली तर दिवसभर उत्साह, ताजेपणा आणि चांगले आराेग्य टिकून राहते.
Powered By Sangraha 9.0