टी पाॅय हा घराच्या सजावटीचा एक महत्त्वाचा घटक मानला जाताे. हाॅलमध्ये ठेवलेला टी पाॅय पाहुण्यांचे लक्ष वेधताे आणि घराला एक वेगळे साैंदर्य प्रदान करताे. मात्र टी पाॅय खरेदी करताना आणि त्याची देखभाल करताना काही गाेष्टींची काळजी घेतली नाही तर ताे टिकाव धरू शकत नाही. म्हणून याेग्य निवड आणि याेग्य देखभाल या दाेन्ही गाेष्टींचा समन्वय आवश्यक आहे. टी पाॅय खरेदी करताना सर्वप्रथम घराच्या सजावटीशी त्याचा मेळ किती बसताे हे पाहणे गरजेचे आहे. जर घरात आधुनिक सजावट असेल तर काच, स्टील किंवा अॅक्रेलिकपासून बनवलेला टी पाॅय शाेभून दिसताे, तर पारंपरिक सजावट असलेल्या घरासाठी लाकडी टी पाॅय अधिक आकर्षक ठरताे. त्याचा आकारही महत्त्वाचा असताे.
खूप माेठा टी पाॅय हाॅलमध्ये गाेंधळ निर्माण करताे, तर खूप लहान टी पाॅय उपयाेगात आणताना असुविधा करताे. त्यामुळे जागेनुसार आकार निवडणे आवश्यक ठरते. साहित्याच्या गुणवत्तेकडेही विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. मजबूत लाकूड किंवा चांगल्या दर्जाचे धातू यांचा वापर केलेला टी पाॅय जास्त टिकताे. काचेच्या टी पाॅयमध्ये वापरलेली काच टेम्पर्ड असेल तर ती सुरक्षित राहते आणि पटकन फुटत नाही. याशिवाय पृष्ठभागावर केलेले फिनिशिंग किंवा पाॅलिश हे दर्जेदार असल्यास ताे दीर्घकाळ नवा दिसताे. टी पाॅय खरेदी केल्यानंतर त्याची देखभाल हाच टिकाऊपणाचा मुख्य घटक ठरताे.धूळ बसू नये म्हणून नियमित स्वच्छता करणे आवश्यक असते. लाकडी टी पाॅयवर पाणी सांडले तर लगेच पुसून टाकावे, अन्यथा डाग पडू शकतात.
वेळाेवेळी पाॅलिश केल्यास लाकूड चमकदार राहते.काचेच्या टी पाॅयसाठी मऊ कापड व हलक्या स्वच्छता द्रव्यांचा वापर करावा, त्यामुळे त्यावर ओरखडे पडत नाहीत. टी पाॅयवर जड वस्तू ठेवणे टाळावे. सततचा ताण सहन केल्याने त्याच्या सांध्यांवर परिणाम हाेऊ शकताे. गरम वस्तू थेट ठेवण्यापेक्षा काेस्टर किंवा मॅटचा वापर केल्यास पृष्ठभाग सुरक्षित राहताे. घरात लहान मुले असतील तर टी पाॅयच्या कडांवर सुरक्षात्मक कव्हर लावल्यास अपघात टाळता येतात. याप्रकारे याेग्य प्रकारे निवड करून आणि नियमित देखभाल करून टी पाॅय अनेक वर्षे नवा भासताे. ताे केवळ घराच्या साैंदर्यात भर घालत नाही तर कुटुंबातील सदस्य आणि पाहुण्यांच्या साेयीसाठी उपयुक्त ठरताे.