भाजप शिवसेना शिंदे गटाच्या युतीकडे लक्ष

25 Sep 2025 15:29:30
 
ma
 
पुणे, 24 सप्टेंबर (आ.प्र.) :
 
 पुणे महापालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्यामध्ये युती होणार की नाही, यावर शिवसेना शिंदे गटाची रणनीती अवलंबून राहील. युती झाली नाही, तर शिवसेना जास्तीत जास्त जागेवर उमेदवार उभे करून, पुण्यातील बहुरंगी लढतीत त्यांची ताकद आजमावणार आहे.
 
कसबा पेठ, हडपसरमध्ये टक्कर
शिवसेना तीन वर्षापूर्वी दोन भागात विभागली गेली, तेव्हा जास्तीत जास्त कार्यकर्ते शिवसेना उद्धव ठाकरे गटासोबत राहिले. माजी नगरसेवक नाना भानगिरे हे शिंदे गटासोबत राहिले. तर, शिवसेनेच्या दहापैकी पाच माजी नगरसेवकांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्यावर पक्षाची शहरप्रमुख म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली. त्यामुळे, शिवसे- नेचे अस्तित्व काही प्रभागात दिसू लागले. कसबा पेठ, हडपसर या विधानसभा मतदारसंघातील काही प्रभागात शिवसेना शिंदे गट ताकदीने लढू शकेल, अशी सध्याची परिस्थिती आहे. राज्यात महायुतीमध्ये भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एकत्र आहेत. पुण्यात गेल्या निवडणुकीमध्ये भाजपला पुणे महापालिकेची एकहाती सत्ता मिळाली होती. त्यामुळे, ते स्वतंत्र लढण्याची तयारी करीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस गेल्या निवडणुकीत मुख्य प्रतिस्पर्धी होता. यावेळी अजित पवार गट स्वतंत्र निवडणूक लढविण्याच्या तयारीला लागला आहे.
 
शिवसेनेला दहा ते वीस जागा
भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती होणार का आणि ती झाल्यास शिवसेनेला किती जागा मिळतील, याचीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मुंबईमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) एकत्र येण्याची शक्यता वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांची युती होण्याची शक्यता आहे. त्यावेळी पुण्यातही युती असावी, अशी मागणी होऊ शकते. त्याबाबत दोन्ही पक्षांचे प्रदेशातील नेते काय निर्णय घेणार, त्यावर पुण्यातील युतीचे भवितव्य आहे. शिवसेनेसोबत युती झाल्यास, पुण्यात भाजपकडून युतीमध्ये शिवसेनेला दहा ते वीस जागा द्याव्या लागतील. त्यामध्ये कसबा पेठ, हडपसर मतदारसंघात प्रत्येकी किमान चार ते पाच जागा, तसेच अन्य प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक-दोन जागा द्याव्या लागतील. भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास, शिवसेना जास्तीत जास्त जागांवर उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न करील. त्याचा फटका संबंधित प्रभागातील स्थानिक परिस्थितीनुसार वेगवेगळ्या उमेदवारांना बसू शकेल. कसबा पेठेतील पूर्व भागा- तील प्रभागात भाजपसमोर शिवसेना आव्हान उभे करण्याची शक्यता आहे. तीच परिस्थिती हडपसरमधील काही प्रभागात दिसून येईल.
 
बहुजनांचे नेते शिंदे यांचा प्रचारात फायदा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या लाडकी बहीण योजनेचा थेट फायदा विधानसभा निवडणुकीत झाला. शिंदे हे बहुजन समाजातील लोकप्रिय नेते आहेत. त्यामुळे, त्याचा निवडणूक प्रचारात आम्हाला चांगला उपयोग होईल. मनपात प्रशासकीय राजवटीत प्रशासक आणि काही राज्यकर्ते यांच्यामुळे भ्रष्टाचार वाढल्याची टीका होत आहे. तो मुद्दा आम्ही प्रचारात मांडू, असे धंगेकर यांनी सांगितले. युती होणार का स्वतंत्र निवडणूक लढवायची आहे, त्याचा निर्णय झाल्यानंतरच पुढील रणनीती स्पष्ट करता येईल, असे त्यांनी सांगितले.
 
भाजपमध्ये पक्षांतर्गत नाराजी
रवींद्र धंगेकर यासंदर्भात म्हणाले, पुण्यात युती होणार की नाही, त्याचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील. पुण्यातील सर्व 165 जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी आम्ही करीत आहोत. भाजपची पक्षांतर्गत नाराजी आहे. त्यामुळे, उमेदवारी न मिळालेले काही इच्छुक अन्य पक्षांकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. काहीजण शिवसेनेकडूनही लढू शकतात. सर्वच शक्यता गृहीत धरून आम्ही शिवसेनेची रणनीती आखत आहोत.
Powered By Sangraha 9.0