आयआयएम मुंबईचे केंद्र आता पुण्यात : मुरलीधर मोहोळ यांचा प्रस्ताव मंजूर

24 Sep 2025 14:27:37
 
 mur
पुणे, 23 सप्टेंबर (आ.प्र.) :
 
पुण्याच्या शैक्षणिक शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार असून, शैक्षणिक नगरी पुण्यात नवे शैक्षणिक द्वार खुले होत आहे. देशातील नामांकित व्यवस्थापन शिक्षणसंस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयआयएम मुंबईचे केंद्र आता पुण्यात सुरू होत आहे. केंद्रीय नागरी उड्डाण व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मांडलेल्या प्रस्तावाला संस्थेच्या डीन कमिटी आणि त्यानंतर cademic Council ने मान्यता दिल्यानंतर हा निर्णय अधिकृत झाला आहे. आयआयएम मुंबईचे केंद्र पुण्यात व्हावे, यासाठी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रस्ताव दिला होता. त्यावर निर्णय होत पुणे केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
पुणे केंद्राची स्थापना ही केवळ पुण्याच्या नव्हे, तर महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि औद्योगिक परंपरेतील एक ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे. पुणे हे देशातील अग्रगण्य तंत्रज्ञान व औद्योगिक केंद्र म्हणून जलद गतीने विकसित होत आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांचे जाळे, अत्याधुनिक संशोधन-विकास केंद्रे, वाढती स्टार्टअप संस्कृती आणि Oxford of the East अशी मिळालेली शैक्षणिक ओळख या सर्व पार्श्वभूमीवर आयआयएम मुंबईचा कॅम्पस शहरासाठी केवळ नैसर्गिक पूरकच ठरणार नाही, तर जागतिक दर्जाच्या व्यवस्थापन शिक्षणाला इथल्या विद्यार्थ्यांना थेट दाराशी आणून देणार आहे. या कॅम्पसच्या माध्यमातून उद्योजकतेला नवा उन्मेष मिळेल, व्यवस्थापन कौशल्यांचा वापर करून नावीन्यपूर्ण कल्पनांचे यशस्वी व्यवसायांत रूपांतर साधता येईल.
 
हा उपक्रम स्वावलंबी भारताच्या संकल्पनेशी सुसंगत असून, विकसित भारत 2047 या राष्ट्रीय दृष्टिकोनाला बळकटी देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. याबाबत माहिती देताना आयआयएम मुंबईचे संचालक प्रा. मनोज कुमार तिवारी म्हणाले, ‌‘आमचा प्रयत्न राहील की शैक्षणिक वर्ष 2026 पासून प्रस्तावित पुणे केंद्रात क्षमता विकास कार्यक्रम तसेच अल्पावधी कार्यकारी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करता यावेत. ही महत्त्वाची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे मनःपूर्वक आभारी आहोत. यामुळे आयआयएम मुंबईला विकसित भारत 2047 या ध्येयाच्या दिशेने मोलाचे योगदान देता येईल.‌’
 
मुंबई-पुण्यामध्ये ‌‘नॉलेज कॉरिडॉर‌’ तयार होईल : मुरलीधर मोहोळ
‘पुण्यात आयआयएम मुंबईचे केंद्र स्थापन होणे ही अभिमानाची बाब आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी आणि पुणे हे तंत्रज्ञान व शिक्षणाचे केंद्र आहे. या दोन्ही शहरांमध्ये निर्माण होणारा Knowledge Corridor ही देशाच्या औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रासाठी नवी पर्वणी ठरेल. या निर्णयामुळे महाराष्ट्राला जागतिक दर्जाच्या व्यवस्थापन शिक्षणाची नवी ऊर्जा मिळेल आणि नव्या पिढीसमोर संधींचे विस्तीर्ण क्षितिज खुले होईल. पुणे अनेक दशकांपासून देशाचे प्रमुख शैक्षणिक केंद्र राहिले आहे आणि आता ते तंत्रज्ञान, उत्पादन, तसेच आयटीचे बळकट हब म्हणूनही उदयास आले आहे. याच वैशिष्ट्यांचा विचार करून आयआयएम मुंबई आपला नवा कॅम्पस पुण्यात स्थापन करीत आहे.
Powered By Sangraha 9.0