रंगमंच विटाळू नका; नाटकाचा शस्त्रासारखा वापर करा : नाना पाटेकर

22 Sep 2025 14:44:26
 
 ran
पुणे, 21 सप्टेंबर (आ.प्र.) :
 
रंगमंच हा अतिशय छोटा दिसत असला तरी हे अतिशय पावन क्षेत्र आहे. रंगमंचाचा योग्य वापर नक्की करा; पण ते विटाळू नका. नट म्हणून विचार केला तर जोपर्यंत नवीन दु:खाच्या शोधात मी फिरत नाही तोपर्यंत नट म्हणून काम करण्याचा मला अधिकार नाही. नाटकात काम करणे हे फक्त करमणुकीपुरते मर्यादित ठेवू नका. सामाजिक, राजकीय परिस्थिती बदलत राहिली तर हेच नाटक शस्त्र म्हणून वापरायला विसरू नका. आपण नट आहोत; जे सांगायचे आहे ते रंगमंचावरून सांगितले तर त्याचे कौतुक होईल, पारितोषिक मिळतील आणि तुम्हाला जे म्हणायचे आहे, ते म्हणू शकाल, असा वडिलकीचा सल्ला ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिला.
 
महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित हीरक महोत्सवी पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवारी (दि. 19) आयोजित करण्यात आला होता. पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी नाना पाटेकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. भरत नाट्य मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रीय कलोपासकचे उपाध्यक्ष सुहास जोशी, अंतिम फेरीतील स्पर्धेचे परीक्षक योगेश सोमण, अेिशनी गिरी, प्रदीप वैद्य मंचावर होते. पारितोषिक वितरण समारंभापूर्वी स्पर्धेत पुरुषोत्तम करंडक पटकाविणाऱ्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयाने (हडपसर) ्‌‍‌‘काही प्रॉब्लेम ये का?‌’ ही एकांकिका सादर केली.
 
स्पर्धेत पारितोषिक मिळण्याचा आनंद क्षणिक असतो. नाटकाचे वेड अंगात भिनायला पाहिजे असे आवर्जून नमूद करून नाना पाटेकर पुढे म्हणाले, ‌‘स्पर्धेतील यश-अपयश विसरता आले पाहिजे. दु:ख गोळा करायला शिका. तिचं दु:खे भूमिकांसाठी उपयोगी पडतील. रंगमंचावर कसे दिसता हा मुद्दा क्षणापुरता असतो; पण प्रेक्षकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचता हा मुद्दा महत्त्वाचा असतो.‌’ ते पुढे म्हणाले, ‌‘प्रत्येकाचा पिंड वेगळा असतो, भवताल वेगळा असतो. लेखक लिहितो, दिग्दर्शक त्याच्या दृष्टीने नाटकाकडे पाहतो. लेखक, नट, दिग्दर्शक यांच्या एकत्रित प्रयत्नातून नाट्यकृती निर्माण होत असते.‌’ नटासाठी शरीर, आवाज किती महत्त्वाचा आहे याचीही उदाहरणे त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.
 
अध्यक्षपदावरून बोलताना कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी म्हणाले, ‌‘पुण्याची सांस्कृतिक शहर म्हणून असलेली ओळख खूप महत्त्वाची आहे. पुरुषोत्तम करंडक ही स्पर्धा केवळ नाट्यप्रयोगाची शृंखला नाही, तर ती तरुणांच्या विचारांची, स्वप्नांची आणि जबाबदारीची अभिव्यक्ती आहे. या मंचावर उभे राहिल्यानंतर असे वाटते की वैेिशक विद्यापीठाच्या हृदयात उभे आहोत, जिथे जीवनाचे धडे शिकविले जातात; प्रश्न विचारले जातात आणि भावी समाजाचे आराखडे रेखाटले जातात.‌’ परीक्षक अेिशनी गिरी, प्रदीप वैद्य आणि योगेश सोमण यांनीही मनोगत व्यक्त केले. स्पर्धे साठी लेखनाच्या उपयुक्ततेविषयी अेिशनी गिरी यांनी महत्त्वाचे मुद्दे विशद केले. स्पर्धेचे हीरक महोत्सवी वर्ष असल्याने स्पर्धेसंदर्भात प्रदीप वैद्य यांनी काही सूचना केल्या. लेखन, दिग्दर्शन, तसेच रंगमंचावरील तांत्रिक बाबींसंदर्भात मार्गदर्शन केले. मान्यवरांचे स्वागत सुहास जोशी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, निकाल वाचन आणि आभार चिटणीस राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी मानले.
Powered By Sangraha 9.0