भाजपचा 125 जागांचा निर्धार, बहुमताने सत्ता मिळविण्याची तयारी

22 Sep 2025 15:00:43
 
 mad
पुणे, 21 सप्टेंबर
(ज्ञानेश्वर बिजले यांजकडून) :
 
पुण्यात पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी भाजपने किमान 125 जागा निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. आणखी काही पक्षप्रवेश नवरात्र उत्सव सुरू झाल्यावर होण्याची शक्यता भाजपच्या वर्तुळात व्यक्त होत आहे. भाजपची भक्कम स्थिती भाजपने पुण्यात गेल्या दहा वर्षात राजकारणावर त्यांची मांड पक्की केली आहे. लोकसभेच्या सलग तीन निवडणुका भाजपने जिंकल्या. विधानसभेच्या तीन निवडणुकांत भाजपचे सहा ते आठ आमदार विजयी झाले. केंद्र व राज्य मंत्रिमंडळात शहराला प्रतिनिधित्व आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत भाजपच्या नगरसेवकांची संख्या 100 पर्यंत पोहोचली. तर, शिवसेनेच्या पाच माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे भाजपचे राजकीय ताकद भक्कम स्थितीत आहे.
 
mad 
 
विरोधकांची स्थिती विस्कळित स्वरूपाची
भाजपच्या तुलनेत विरोधकांची स्थिती खूपच विस्कळीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना दोन गटात विभागणी गेली, तर काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत वाद रंगत आहेत. पुण्यातील तीन पक्षांची महाविकास आघाडी होण्याची शक्यता आहे. तरी देखील सर्व प्रभागात ती ताकदीचे चार उमेदवारांचे पॅनल उभे करण्याची शक्यता सध्या तरी धूसर वाटत आहे. महायुतीतील मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटच भाजपसमोर प्रतिस्पर्धी म्हणून उभा ठाकणार आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाची पुण्यात ताकद कमी आहे. त्यामुळे त्यांच्याशी युती होईल काय, याची चर्चा भाजपमध्ये दबक्या आवाजात होत आहे.
 
भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी
 भाजपमध्ये नगरसेवकांसोबतच निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या इच्छुकांची संख्या मोठी आहे. जिंकून येण्याची शक्यता असलेल्या प्रभागात एकेका जागेसाठी पाच सहा जण उमेदवारांसाठी आग्रही आहेत. त्यातच विरोधकांची ताकद जास्त असलेल्या प्रभागात विरोधी पक्षातील मातब्बर कार्यकर्ते किंवा माजी नगरसेवकांना पक्षात प्रवेश देण्याबाबत विचार सुरू आहे. त्यामुळे नवरात्र उत्सव, दिवाळी या सणांच्या काळात त्यांचे पक्षप्रवेश होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
 
चाळीस नगरसेवकांना तिकीट नाकारणार
इच्छुकांची भाऊगर्दी आणि जिंकून येण्याची क्षमता या निकषामुळे गेल्या 2017 च्या निवडणुकीतील किमान 40 माजी नगरसेवकांना यावेळी भाजपचे निवडणुकीचे तिकीट नाकारण्यात येणार असल्याची पक्षांतर्गत चर्चा आहे. माजी नगरसेवकांच्या काही जागा अगोदरच रिक्त झाल्या आहेत. काही ज्येष्ठांना संधी नाकारण्यात येईल, तर अपेक्षित कामगिरी नसलेल्या काही जणांना घरी बसवण्यात येईल. आरक्षणामुळे काही जागा रिकाम्या होण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी नव्या तरुण चेहऱ्यांना संधी दिली जाईल. पक्षात नाराजांची संख्या मोठी राहणार आहे. ती नाराजी काही प्रमाणात शमविण्याचा प्रयत्न करताना, युवा नेतृत्व पुढे आणण्याचा प्रयत्न भाजप श्रेष्ठींकडून होतील.
 
आरक्षण ठरल्यावरच उमेदवारीबाबत चर्चा
राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या, ‌‘प्रारूप प्रभागरचना नुकतीच झाली आहे. अंतिम प्रभागरचना जाहीर होईल. प्रभागातील आरक्षण निश्चित केले जातील. आरक्षणानंतर प्रभागनिहाय राजकीय स्थिती कशी आहे, त्याचा अभ्यास केला जाईल. त्यानंतर, उमेदवारांच्या नावाची चर्चा होईल. सध्या तरी पक्ष बळकट करण्यावर भर दिला जात आहे. पुण्यात पुन्हा भाजपचीच सत्ता येईल. पर्वती मतदारसंघात गेल्या वेळेसारखे भाजपचेच वर्चस्व राहील. यंदा भाजप नगरसेवकांची संख्या वाढविण्याकडे आमचे लक्ष राहील.
 
भाजपचे बहुमत आणणार : धीरज घाटे
भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले, ‌‘105 माजी नगरसेवक आणि गेल्या वेळी थोडक्यात गमावलेल्या 20 जागा अशा किमान सव्वाशे जागा जिंकण्याचा निर्धार आम्ही केला आहे. महायुती होणार की नाही, ते पक्षश्रेष्ठी ठरवतील. त्यामुळे सर्व जागांवर तयारी सुरू केली आहे. अन्य पक्षातील कार्यकर्त्यांना प्रवेश देण्याबाबत सध्या फारशी चर्चा सुरू नाही. मात्र विरोधी पक्ष ज्या प्रभागात प्रभावी वाटतात, त्या ठिकाणी पक्षप्रवेशाचा विचार होऊ शकतो. भाजपचे पुन्हा बहुमत आणण्यासाठी आम्ही लढणार आहोत.‌’
Powered By Sangraha 9.0