पाहा पां अनुरागें भजे । जे प्रियाेत्तमें मानिजे । ते पतीहूनि काय न वानिजे। पतिव्रता।। 6.129

18 Sep 2025 16:48:11
 
 

saint 
 
अर्जुनाच्या प्रेमाने श्रीकृष्णांना गहिवरून आले आहे. हा जर आपणांत येऊन मिसळला म्हणजे एकरूप झाला तर आपलीच अडचण हाेईल. मग ‘अर्जुना’ म्हणून आपण काेणास हाक मारणार? काेणास उपदेश करणार? काेणावर रागावणार? मनातील एखादा चांगला विचार आपण काेणास सांगणार? अशा विचारांनी श्रीकृष्णांचे मन प्रेमाने आर्द्र झाले आहे.आपण काही विपरीत बाेलत आहाेत की काय अशी शंका मनात येऊन ज्ञानेश्वर म्हणतात की, श्राेत्यांच्या कानाला कदाचित हे अवघड लागेल; पण अर्जुन म्हणजे श्रीकृष्णांच्या प्रेमाची प्रत्यक्ष ओतीव मूर्तीच आहे असे समजावे किंवा एखाद्या म्हाताऱ्या वांझेला पुत्र झाल्याचे सुख मानावे.
 
नाहीतर मी असे वर्णन केले नसते असे ज्ञानेश्वर सांगतात. आवड आणि लाज, व्यसन आणि तिटकारा, पिसाट आणि शुद्धी यांची जाेडी एकत्र कशी राहणार? आवड म्हटली की लाज उरत नाही.व्यसन म्हटले की तिटकारा संपला. पिसे म्हटले की शुद्धी संपली. सारांश असा की, अर्जुन व श्रीकृष्ण यांच्या प्रेमाचे रूपच असे आहे आणि हे प्रकट हाेण्यासाठी अर्जुनाची पुण्याई ार थाेर व पवित्र आहे. म्हणूनच भक्तीचे बी सुपीक क्षेत्रामध्ये रुजवून घेण्यास अर्जुनाचे अंत:करण तयार झाले आणि हा कृष्णही त्याच्यावर असा भाळला आहे की, स्वत:चे माहात्म्य न सांगता ताे अर्जुनाचेच गुणगान करीत आहे. खरेच आहे, पतिव्रता एकनिष्ठपणे पतीची सेवा करते आणि पती तिचा मान ठेवीत असला तरी पतिव्रतेची स्तुती पतीपेक्षा अधिक हाेत नाही का? याप्रमाणे अर्जुनाचीच विशेष स्तुती करावी असे भगवंतांना वाटले. कारण या प्रेमामुळेच श्रीकृष्ण अमूर्त असूनही अर्जुनाला वश हाेऊन सगुणसाकार झाले.
Powered By Sangraha 9.0