जिल्हा पातळीवर आयाेजित राष्ट्रीय लाेकअदालतीतून कल्याण परिमंडलातील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित; तसेच वीजचाेरीची दाखलपूर्व व प्रलंबित अशी 14790 प्रकरणे तडजाेडीद्वारे निकाली काढण्यात आली. महावितरणच्या उपलब्ध सवलतीचा लाभ घेत संबंधित ग्राहकांनी 11 काेटी 51 लाखांचा भरणा केला. कल्याण परिमंडलातील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्यास; तसेच वीजचाेरीची दाखलपूर्व व प्रलंबित प्रकरणे सामंजस्याने साेडवण्यासाठी एकूण 1 लाख 69 हजार 858 ग्राहकांना नाेटीस पाठवण्यात आली हाेती. त्यापैकी सुमारे 15 हजार ग्राहक उपस्थित हाेते.
महावितरण आणि ग्राहकांत तडजाेड हाेऊन 11.52 काेटींचा भरणा करण्यात आला. यात कल्याण मंडल-1मध्ये 95 प्रकरणांत तडजाेड हाेऊन 44 लाख 63 हजारांची, कल्याण मंडल-2 मध्ये 7554 प्रकरणांत 7 काेटी 62 लाख रुपयांच्या वसुलीने प्रकरणे सामाेपचाराने मिटवण्यात आली. वसई मंडलात 6055 प्रकरणांच्या निपटाऱ्यातून 3 काेटी 27 लाखांची वसुली हाेऊ शकली.पालघर मंडल कार्यालयांतर्गत 18 लाखांचा भरणा करणाऱ्या 386 ग्राहकांची प्रकरणे निकाली काढण्यात आली. ठाणे आणि पालघर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सहकार्याने तसेच कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते, महावितरणच्या विधी विभागाने लाेकअदालत यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.