नागरिकांच्या मागणीनुसारच लोकमान्यनगरचा विकास व्हावा

18 Sep 2025 14:28:47
 
 nag
पुणे, 17 सप्टेंबर
(आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
 
लोकमान्यनगर येथील म्हाडाच्या इमारतींच्या रिडेव्हलपमेंटवरून भाजपचे शहराध्यक्ष आणि स्थानिक माजी नगरसेवक धीरज घाटे यांनी स्थानिक आमदार हेमंत रासने यांना उघड विरोध दर्शविला आहे. स्थानिक नागरिकांनी जरी डेव्हलपमेंटला मान्यता दिली असताना आमदार हेमंत रासने यांनी या कामाला स्थगिती आणली आहे. घाटे यांनी नागरिकांची बाजू घेत येथील रिडेव्हलपमेंटचे काम एकल पद्धतीनेच व्हावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. त्यामुळे या रिव्हलपमेंटवरून रासने विरुद्ध घाटे संघर्ष निर्माण झाला आहे. लोकमान्यनगरमधील म्हाडाच्या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी येथील नागरिक एकवटले आहेत.
 
काही इमारतींचे क्लस्टर, तर काहींचे स्वतंत्रपणे रिडेव्हलपमेंट करण्यासाठी विकसकदेखील नेमले आहे, ततसे फलकच लोकमान्यनगरमध्ये ठिकठिकाणी लागले आहेत. विकसक काम सुरू करण्याच्या तयारीत असतानाच नुकतेच काही महिन्यांपूर्वी आमदार झालेल्या हेमंत रासने यांनी या संपूर्ण भागाचा एकत्रित विचार करून पुनर्विकास करावा तोपर्यंत कामाला स्थगिती द्यावी, अशी मागणी शासनाकडे केली होती. शासनानेही त्याचा विचार करून पुनर्विकासाच्या कामाला स्थगिती दिली आहे. याविरोधात स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. नागरिकांनी मागील महिनाभरात या ठिकाणी आंदोलने करत रासने यांचा निषेध तर केलाच त्याचवेळी स्थगिती देणाऱ्या शासनाचाही निषेध केला.
 
दोन दिवसांपूर्वी येथे सह्यांची मोहीम राबवत रासने; तसेच शासनाचा निषेध करण्यात आला. दरम्यान, भाजपचेच शहराध्यक्ष व स्थानिक माजी नगरसेवक धीरज घाटे यांनी शासनाने आणलेल्या स्थगितीला विरोध दर्शवत नागरिकांच्या म्हणण्यानुसारच लोकमान्यनगरचा पुनर्विकास व्हावा, याला पाठिंबा दर्शविला आहे. रविवारी पुणे दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत घाटे यांनी निवेदन दिले आहे. त्यामध्ये माझ्या प्रभागातील लोकमान्यनगर वसाहतीच्या पुनर्विकास धोरणाबाबत तेथील नागरिकांसोबत बैठक घेऊन लवकरात लवकर हा प्रश्न सकारात्मक पद्धतीने मार्गी लावावा, अशी विनंती करणारे निवेदन मुख्यमंत्री फडणवीस यांना देण्यात आले.
 
पुण्यातील लोकमान्यनगर वसाहतीमधील विविध सोसायट्यांच्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न ऐरणीवर आहे. लोकमान्यनगरमधील नागरिक गेल्या काही महिन्यांपासून पुनर्विकासाच्या प्रश्नावरून माझी भेट घेऊन त्यांची भूमिका मांडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. येथील इमारतींचा एकल पद्धतीने पुनर्विकास करण्यात यावा, अशी नागरिकांची मागणी आहे. मुख्यमंत्र्यांनी निवेदन स्वीकारले असून, मला हा विषय माहिती आहे. या संदर्भात लवकरच सगळ्यांशी चर्चा करून तोडगा काढला जाईल, असे त्यांनी सांगितले.
 
बड्या बिल्डरांच्या फायद्यासाठी मतदारांचा सौदा करणाऱ्यांना जागा दाखवू
शहराच्या नवी सदाशिव पेठ या मध्यवर्ती भागात काही एकरांमध्ये असलेल्या लोकमान्यनगर येथील म्हाडाच्या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी बलाढ्य विकसक सरसावले आहेत. हे विकसक शासनातीलच सत्ताधारी भाजपच्याच बड्या नेत्याचे निकटवर्तीय आहेत. लोकमान्यनगरचा एकत्रित विकास केल्यास या विकसकाला आणि पर्यायाने बड्या नेते मंडळींसह स्थानिक नेत्यांना मोठा मलिदा मिळणार आहे. त्यामुळेच नागरिकांचे म्हणणे टाळून किंबहुना त्याकडे दुर्लक्ष करून सध्याचे पुनर्विकसनाचे करार रद्द होतील यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. आमच्या मतांचा सौदा करणाऱ्यांना आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत विरोध करणार आहोत, तर आगामी निवडणुकांमध्ये आमच्याच मतांवर विजयी होणाऱ्या लोकप्रतिनिधींना त्यांची जागा दाखवू, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
Powered By Sangraha 9.0