इंदापूर तालुक्यातील सणसर गावात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पाहणी केली.तसेच पूरग्रस्त भागातील नागरिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. प्रशासनाने तालुक्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून बाधितांना तातडीची मदत करण्याचे निर्देश त्यांनी दिले.उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी सणसर परिसरातील नुकसानीची माहिती भरणे यांना दिली. सणसर येथील ओढ्याला पूर येऊन वस्तीत पाणी शिरल्याने गावकऱ्यांना माेठ्या अडचणींना सामाेरे जावे लागले. माेठ्या प्रमाणात पाणी शिरलेल्या वस्त्यांतील नागरिकांना मदत करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कामे करावीत, असे भरणे यांनी सांगितले.ओढा खाेलीकरणाची नागरिकांची मागणी विचारात घेता प्रशासनाने लवकरात लवकर ओढ्यांचे खाेलीकरण करावे, असे निर्देशही त्यांनी दिले. यावेळी तहसीलदार जीवन बनसाेडे, गटविकास अधिकारी सचिन खुडे, तालुका कृषी अधिकारी दीपक गरगडे, संबंधित विभागांचे अधिकारी, स्थानिक लाेकप्रतिनिधी, नागरिक उपस्थित हाेते