छत्रपती संभाजी महाराज शिल्पासमोर गगनभेदी मानवंदनेसह हजारो नतमस्तक

    16-Sep-2025
Total Views |
 
 ch
पिंपरी, 15 सप्टेंबर (आ.प्र.) :
 
भाजपा नेते, भोसरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण अर्थात जगातील सर्वात उंच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती शिल्पासमोर रविवारी इतिहास रचला गेला. हजारो शिवशंभूप्रेमी, ढोल-ताशा वादक यांच्या माध्यमातून गगनभेदी मानवंदना छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरणी अर्पण करण्यात आली. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी वरुणराजाने देखील हजेरी लावली. ढोल ताशांच्या गजरातील मानवंदनेने आसमंती एकच गगनभेदी गजर झाला. दाही दिशा शिवशंभूच्या नावापुढे नतमस्तक झाल्या. मोशी येथील पीएमआरडीएच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राच्या जागेत हे स्मारक उभारण्यात येत आहे.
 
ch 
 
या स्मारकाला मानवंदना देण्यासाठी हिंदू भूषण स्मारक ट्रस्ट, ढोल ताशा महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने 3, 000 पेक्षा अधिक ढोल, 1,000 पेक्षा अधिक ताशे, तसेच 500 ध्वजांच्या गजरात रविवारी मोशी येथे उभारण्यात आलेल्या स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण अर्थात जगातील सर्वात मोठ्या धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शिल्पा समोर मानवंदना देण्यात आली. ही अभूतपूर्व मानवंदना एका ऐतिहासिक क्षणाची साक्ष ठरली. महाराष्ट्रातील शंभराहून अधिक नामांकित ढोल-ताशा पथके यात सहभागी झाली होती. कार्यक्रमासाठी पार्किंग, भोजन, पिण्याचे पाणी तसेच वैद्यकीय सेवा अशा आवश्यक सर्व सुविधा सज्ज होत्या. नियोजित आणि चोख नियोजनामध्ये हा कार्यक्रम हजारोंच्या उपस्थितीत पार पडला.
 
जगातील सर्वात उंच स्मारक साकारण्याची संकल्पना भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांची आहे. या स्मारकाच्या माध्यमातून अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून छत्रपत्री संभाजी महाराजांचा जीवनपट उलगडण्यात येणार आहे. संभाजी महाराज यांच्या आयुष्यातील ऐतिहासिक जीवनसंघर्ष, त्यांची धर्मनिष्ठा, मुघलांविरुद्ध लढाई, त्याग आदींचा जिवंतपणे अनुभव घेण्यासाठी एसआर व व्हीआर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात असून लोकार्पण होण्यापूर्वी शंभूराजांच्या चरणी हजारोंच्या संख्येने मानवंदना अर्पित करण्यात आली. या मानवंदनासाठी महाराष्ट्रातून अनेक नावाजलेले ढोल ताशा पथक सहभागी झाले.