म्हाडा कोकण मंडळातर्फे दुकानांचा ई-लिलाव

    16-Sep-2025
Total Views |
 
 mhad
 
मुंबई, 15 सप्टेंबर (आ.प्र.) :
 
म्हाडाच्या कोकण मंडळाने आपल्या प्रकल्पांतील दुकानांचा ई-लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विरार, बोळींज आणि चितळसर, मानपाडा येथील एकूण 71 दुकानांच्या ई- लिलावासाठी नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखेडे यांच्या हस्ते या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. या लिलावाच्या माध्यमातून विरार, बोळींज आणि चितळसर, मानपाडा येथे परवडणाऱ्या दरात दुकान खरेदीची संधी उपलब्ध झाली आहे.
 
विरार, बोळींजमधील 44 आणि चितळसरमधील 27 दुकानांच्या ई- लिलावासाठी नोंदणी, अर्जविक्री स्वीकृती प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली. अर्ज भरून संगणकीय पद्धतीने कागदपत्रे जमा करण्याची मुदत 25 सप्टेंबरला रात्री 11.59 पर्यंत असणार आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही करून 13 ऑक्टोबरला सकाळी 11 पासून पात्र अर्जदारांना संगणकीय पद्धतीने बोली लावून ई-लिलावात सहभागी होता येणार आहे. 14 ऑक्टोबरला ई-लिलावाचा निकाल दोन्ही संकेतस्थळांवर जाहीर केला जाणार आहे.