पुणे, 13 सप्टेंबर (आ.प्र.) :
‘नवीन शिक्षण प्रणाली अनेक सकारात्मक बदल घडून आणेल व यामुळे शिक्षकांना त्यांच्या कौशल्यविकासाला वाव मिळेल’, असे प्रतिपादन प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन डॉ. गजानन एकबोटे यांनी केले. शिक्षक दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पुणे जिल्हा शिक्षक आघाडीतर्फे आयोजित कार्यक्रमात डॉ. एकबोटे यांना जीवनगौरव शिक्षणरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 75 शिक्षकांना या वेळी गौरविण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उच्चशिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर तसेच अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष मंदार रेडे, शिक्षक आघाडी अध्यक्ष राजेंद्र जोशी उपस्थित होते.
शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्रा. माधवी नानल, प्रदीप पुराणिक व मेघना भावे या शिक्षकांचा शिक्षणरत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला. मॉडर्न कॉलेजच्या प्राचार्यपदी निवड झाल्याबद्दल प्रा. निवेदिता एकबोटे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. डॉ. देवळाणकर यांनी मार्गदर्शन केले. डॉ. कुलकर्णी यांनी आत्मनिर्भर उद्योजक घडविण्यासाठीच्या योजनांची माहिती दिली.
रेडे यांनी आगामी काळात सर्व शिक्षणतज्ज्ञ शिक्षकांची एक राज्यस्तरीय समिती तयार करून संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक कौशल्यविकासाला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. प्रा. जोशी यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या आयोजनात प्रा. शुभांगी दौतखाने, भाग्यश्री सुपनेकर, वैशाली कमाजदार, हर्षद गाडगीळ, विकास कंकाळ, वसंत कुलकर्णी यांनी सहभाग घेतला. गीता देशमुख व ममता कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. श्रुती कुलकर्णी यांनी आभार मानले.