पुणे, 14 सप्टेंबर (आ.प्र.) :
केंद्र सरकारने वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) रचनेमध्ये केलेली आतापर्यंतची सर्वांत मोठी व सर्वांना लाभ मिळवून देणारी सुधारणा अमलात येईल, तेव्हा देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा दावा भाजपचे सहमुख्य प्रवक्ते विश्वास पाठक यांनी केला. नवरात्रीपासून हा बदल लागू होत असून, दिवाळीपर्यंत अनेक वस्तू ग्राहकांना स्वस्तात मिळतील, असे त्यांनी सांगितले. भाजप शहर कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यावेळी उपस्थित होते.
जीएसटीसंदर्भात बोलताना पाठक म्हणाले, ‘जीएसटीत बदल करणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून जाहीर केले होते. जीएसटी परिषदेने जीएसटी सुधारणांचा नवा प्रस्ताव एकमताने संमत केला. सध्याच्या चारस्तरीय कररचनेचे सुसूत्रीकरण करून केवळ 18 टक्के आणि पाच टक्के एवढ्या दोन स्तरांत नवी जीएसटी कर आकारणी होणार आहे. कर कमी झाल्याने अनेक वस्तू स्वस्त होतील. त्याचा फायदा सर्वसामान्यांना होईल.’ जीएसटी कर आकारणी जुलै 2017 मध्ये सुरू झाली. देशात वेगवेगळ्या प्रकारचे 150 कर होते. ते एकत्रित करण्यात आले. तेव्हा दरमहा 30 ते 40 हजार कोटी रुपये जीएसटी मिळत होता. आता तो दरमहा दोन लाख कोटी रुपये झाला आहे.